उत्सवात मेगाब्लॉकचे विघ्न! आज मध्य, हार्बर मार्गावर ब्लॉक, परेच्या प्रवाशांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 05:22 AM2017-08-27T05:22:02+5:302017-08-27T05:22:02+5:30
गणेशोत्सवासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशी मुंबईकर मोठ्या संख्येने बाहेर पडतील. परंतु या प्रवासात मेगाब्लॉकचे विघ्न आहे. मध्य रेल्वेवरील कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर आणि हार्बर रेल्वेवरील कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाउन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : गणेशोत्सवासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशी मुंबईकर मोठ्या संख्येने बाहेर पडतील. परंतु या प्रवासात मेगाब्लॉकचे विघ्न आहे. मध्य रेल्वेवरील कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर आणि हार्बर रेल्वेवरील कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाउन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असल्याने, रविवारी असणारा जम्बो ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
कल्याण ते ठाणे स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर रविवारी सकाळी ११.१५ ते सायंकाळी ४.१५ वाजेपर्यंत रेल्वे रुळाच्या देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक अप धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. परिणामी, लोकल गाड्या २० मिनिटे उशिराने धावतील.
हार्बरच्या प्रवाशांसाठी विशेष लोकल
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी १०.२० ते दुपारी ३.४८ वाजेपर्यंत ब्लॉक राहणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल अशा विशेष लोकल चालविण्यात येणार आहे. दरम्यान, त्याच तिकीट आणि पासवर सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर आणि मध्य मार्गावरून प्रवास करण्याची मुभा रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
लोकलचे ६ डबे घसरले, ६ प्रवासी जखमी
माहीम येथे शुक्रवारी हार्बर मार्गावरील लोकलचे ६ डबे रुळावरून घसरले. सकाळी ९.०७ मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून अंधेरीच्या दिशेने जाणाºया लोकलचा ट्रॅक बदलताना हा अपघात घडला. अपघातात सहा प्रवासी जखमी झाले होते. या अपघातामुळे तब्बल दहा तास हार्बरवरील वेळापत्रक कोलमडले होते. रात्री ७.४२ मिनिटांनी माहीम येथील वाहतूक पूर्वपदावर करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. यातील गंभीर जखमी असलेल्या बांकेलाल कनोजिया या प्रवाशाला २५ हजार रुपयांची, तर उर्वरित पाच प्रवाशांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत करणार असल्याचे पश्चिम रेल्वेच्या वतीने जाहीर करण्यात आले.