मध्य व हार्बरवरचा मेगाब्लॅाक रद्द; पश्चिम रेल्वेवर मात्र कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 09:33 AM2019-07-28T09:33:10+5:302019-07-28T09:33:14+5:30
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मध्य व हार्बर रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने ट्रेनच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या.
मुंबई: मध्य व हार्बर रेल्वे मार्गावरील रविवारचा मेगाब्लॅाक रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनकडून घेण्यात आला आहे. मात्र पश्चिम रेल्वे मार्गावरील भाईंदर ते वसई रोडदरम्यान जलद मार्गावरील मेगाब्लॅाक कायम राहणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मध्य व हार्बर रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने ट्रेनच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच शनिवारी महालक्ष्मी एक्सप्रेस वांगणी स्थानका दरम्यान अडकल्याने ठाणे - कर्जत मार्गावरील रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे प्रवाशांना खूप हाल सहन करावे लागल्याने हा निर्णय घेण्यात आला.
पश्चिम रेल्वे मार्गावर भाईंदर ते वसई रोड स्थानकांदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत दोन्ही दिशेकडील जलद मार्गांवर ब्लॉक असेल. या काळात चर्चगेट दिशेकडील लोकल विरार/वसई रोडहून भाईंदर/ बोरीवलीपर्यंत धिम्या मार्गावर धावतील.