मुंबई : मध्य रेल्वेकडून विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी आपल्या उपनगरी भागांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. ठाणे-कल्याण अप व डाउन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३७ ते दुपारी २.४८ पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील वदरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील. कल्याण येथून सकाळी १०.२६ ते दुपारी ३.१९ पर्यंत सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. या सेवा कल्याण ते ठाणे दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबून पुढे मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळविण्यात येतील व आपल्या निर्धारित थांब्यांवर थांबतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ या वेळेत सुटणाऱ्या बेलापूर / पनवेल / वाशीसाठीच्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तसेच ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला आणि वाशी-पनवेल विभागात विशेष गाड्या चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० या वेळेत ट्रान्स हार्बर मार्ग / मध्य रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी राहील.