दिवाळीच्या खरेदीवर मेगाब्लॉकचे विघ्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 03:43 AM2019-10-21T03:43:58+5:302019-10-21T06:07:25+5:30
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला होता.
मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे अनेक लोकल फेºया रद्द करण्यात आल्या, तर काही लोकलच्या मार्गातही बदल करण्यात आले होते. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी सहकुटुंब बाहेर पडलेल्या प्रवाशांचे लोकलच्या गर्दीमुळे हाल झाले. विशेषत: कुर्ला, दादर, वांद्रे, सांताक्रुझ, बोरीवली या स्थानकांवर प्रचंड गर्दी होती.
मध्य, पश्चिम, हार्बरसह ट्रान्सहार्बर मार्गावरही रेल्वे प्रशासनाने रविवारी मेगाब्लॉक घेतला होता. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल दिवा ते परळपर्यंत धिम्या मार्गावर चालविण्यात आल्या. कमी वेळात पोहोचण्यासाठी दिवाळीसाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांनी जलद लोकल पकडली. मात्र, या लोकल सर्व स्थानकांवर थांबत असल्याने प्रवाशांचा गोंधळ झाला, शिवाय प्रवासात त्यांचा अधिक वेळ गेला. उपनगरातून प्रवासी कुर्ला, दादर, लालबाग येथे येत होते. त्यामुळे कुर्ला, दादर या स्थानकांवर प्रचंड गर्दी होती. दिवाळीच्या खरेदीचे संपूर्ण सामान घेऊन परतीचा प्रवास करताना प्रवाशांच्या नाकीनऊ आले.
पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान जम्बोब्लॉक होता. या ब्लॉकचा परिणाम अन्य लोकलवर झाला. ब्लॉक दरम्यान अनेक लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे इतर लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली होती. दादर, वांद्रे, सांताक्रुझ, अंधेरी, बोरीवली या स्थानकांवर प्रचंड गर्दी होती. हार्बर मार्गावरील लोकलसेवा सकाळपासूनच विस्कळीत होती. गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी जादा पैसे देऊन खासगी वाहतुकीचा वापर केला.
लोकलमध्ये ब्लॉकची उद्घोषणा करण्याची मागणी
मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकांवर जलद लोकलची उद्घोषणा करण्यात येत होती. मात्र, लोकल प्रत्येक स्थानकावर थांबत होत्या. त्यामुळे चढणाºया, तसेच उतरणाºया प्रवाशांचा गोंधळ झाला. हे लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने प्रत्येक लोकलमध्ये रविवारच्या ब्लॉकची माहिती देऊन त्या संदर्भात उद्घोषणा करणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.
तीन तास हार्बर मार्ग बंद
शिवडी स्थानकादरम्यान रविवारी पहाटे ५ वाजता लोकलचा पेंटाग्राफ आणि ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली. घटनास्थळी रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी धाव घेऊन लोकल सेवा ७.५० वाजता सुरू केली. मात्र तब्बल तीन तासांनी सीएसएमटी ते वडाळा रोड मार्ग खुला झाला. परिणामी रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. रविवारी सीएसएमटी ते वडाळा रोड ब्लॉक घेण्यात आला नव्हता. मात्र शिवडी येथे पेंटाग्राफ आणि ओव्हरहेड वायर तुटली. या वेळी अनेक फेºया रद्द करण्यात आल्या. परिणामी प्रवाशांना बिघडलेल्या वेळापत्रकाला सामोरे जावे लागले.