मेगाब्लॉकसह एक्स्प्रेस बिघाडाने प्रवाशांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 06:17 AM2019-05-27T06:17:49+5:302019-05-27T06:17:54+5:30
मध्य रेल्वे मार्गावर रविवारी रेल्वे मार्गाचे दुरुस्तीचे काम करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला होता.
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर रविवारी रेल्वे मार्गाचे दुरुस्तीचे काम करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे अनेक लोकल अवेळी चालविण्यात येत होत्या. तर दुसरीकडे मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे रेल्वे स्थानकात प्रगती एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने रेल्वे मार्ग विस्कळीत झाला होता. परिणामी प्रवाशांचे हाल झाले. मेगाब्लॉकवेळी जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर चालविण्यात आल्या. त्यामुळे प्रवासी जलद लोकलमध्ये बसून देखील धीम्या मार्गावर प्रवास केला. परिणामी प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचण्यास उशीर झाला.
ठाणे स्थानकात प्रगती एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडल्यामुळे मध्य रेल्वे मार्ग विस्कळीत झाला होता. त्यामुळे पुण्यावरून मुंबईच्या दिशेला येणाऱ्या आणि मुंबईच्या दिशेने जाणाºया मेल, एक्स्प्रेस आणि लोकल सेवेवर परिणाम झाला. इंजिन बंद पडल्यामुळे तत्काळ रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचून इंजिनाची दुरुस्ती करण्यास सुरूवात केली. यासाठी एक तासांचा कालावधी गेल्याने प्रवाशांना ताटकळत बसावे लागले. मेगाब्लॉक आणि इंजिन बिघाडामुळे प्रवाशांना दुहेरी समस्येला सामोरे जावे लागले.