Join us

हुश्श! संपला मेगाब्लॉक; कर्नाक पुलाचे पाडकाम पूर्ण, मध्य रेल्वेवर १७ तासांनी धावली पहिली लोकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2022 8:32 AM

मध्य रेल्वेवरील या मेगाब्लॉकचे नियोजन गेले काही दिवस सुरू होते. मात्र, गेल्या आठवड्यात रेल्वेने त्याचे वेळापत्रक जाहीर केले.

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील ब्रिटिशकालीन कर्नाक पूल तोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जीद बंदर रेल्वेस्थानकादरम्यानचा मेगाब्लॉक अखेर १७ तासांनी संपला आणि प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पूल तोडण्याचे मध्ये रेल्वेचे नियोजन यशस्वी झाल्याने ठरलेल्या वेळेपूर्वी जवळपास दहा तास अगोदर सीएसएमटीवरून ठाण्याला दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी पहिली लोकल निघाली, तर हार्बर मार्गावरून सायंकाळी ५ वाजून ५२ मिनिटांनी पहिली लोकल पनवेलला रवाना झाली. 

मध्य रेल्वेवरील या मेगाब्लॉकचे नियोजन गेले काही दिवस सुरू होते. मात्र, गेल्या आठवड्यात रेल्वेने त्याचे वेळापत्रक जाहीर केले. राज्यभरात, परराज्यात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या ३५ एक्स्प्रेस रद्द केल्याने, अनेक गाड्या मधूनच मागे वळवल्याने आणि अनेक लोकल रद्द करून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे जाहीर केल्याने या मेगाब्लॉकचा संपूर्ण  राज्याला फटका बसला. या काळात प्रत्येक स्थानकात बंदोबस्त वाढवल्याने, प्रवाशांना मार्गदर्शनासाठी पोलिस नेमल्याने, मदत कक्ष ठेवल्याने आणि नेहमीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने उद्घोषणा करण्यात आल्याने तुलनेने या काळात प्रवाशांना दिलासा मिळाला. 

प्रवाशांची संख्या तुलनेने कमी -एरवी रविवारी, मेगाब्लॉकच्या काळात लोकलला जेवढी गर्दी असते, त्यापेक्षा तुलनेने कमी गर्दी या काळात होती. अनेक प्रवाशांनी रेल्वे प्रवास टाळला. शिवाय रविवारचे वेळापत्रक, १५ डब्यांच्या गाड्या आणि वातानुकूलित लोकल नसल्याने वाहतूक बऱ्यापैकी सुरळीत होती. शिवाय, एकही मेल-एक्स्प्रेस या काळात कुर्ला-दादरच्या पुढे आणण्याचा अट्टाहास रेल्वेने टाळला. त्याचाही परिणाम दिसून आला.   

बेस्ट, टॅक्सीला गर्दी भायखळा ते सीएसटीएम आणि वडाळा ते सीएसटीएम लोकल वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांनी बेस्ट, टॅक्सींचा आधार घेतला; पण बेस्टची सेवा अपुरी पडली आणि टॅक्सीचालकांनी अनेक ठिकाणी मनमानी भाडे आकारल्याच्या तक्रारी होत्या. सीएसएमटीवर शुकशुकाट-    मुंबईतील ऐतिहासिक स्थानक असलेल्या सीएसएमटीत दररोज लाखो प्रवाशांची ये-जा असते परंतु कर्नाक उड्डाणपूल तोडण्यासाठी भायखळा ते सीएसएमटी आणि वडाळा ते सीएसएमटी मार्गावर मेगाब्लॉक होता.-    त्यामुळे सीएसएमटी स्थानकात प्रथमच दिवसाढवळ्या शुकशुकाट पाहायला मिळाला.

सर्व रेल्वे मार्ग आणि सीएसएमटी स्थानकावरील वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने वेळेत हे करण्याचे आव्हान होते. मात्र, बारकाईने केलेले नियोजन आणि स्थानीय यंत्रणांशी योग्य समन्वयामुळे आम्हाला हे प्रचंड काम नियोजित वेळेआधी पूर्ण करता आले. यात टीमवर्कचा मोठा वाटा आहे. या मेगा ट्रॅफिक ब्लॉकचा उपयोग मोठ्या प्रमाणात इतर कामांसाठीही करण्यात आला.- अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे

...म्हणून 10 तास आधी काम पूर्ण -१५ वर्षांपूर्वी मशीद उड्डाणपूल पाडण्यात आला होता. तेव्हा रेल्वेचे नियोजन कोलमडले होते. रस्त्यावरील काँक्रीट हटविण्यास तेव्हा वेळ लागला होता.. त्यापासून धडा घेत मध्य रेल्वेने २७ तासांच्या ब्लॉकदरम्यान कर्नाक पूल तोडण्यासाठी काटेकोर नियोजन केले. तसेच गेल्या तीन महिन्यात रस्त्यावरील काँक्रीट हटविले. फुटपाथ काढले. त्यामुळे केवळ सांगाड्याचे तुकडे करून ते हटवण्याचेच काम शिल्लक होते. 

हा १५४ वर्षे जुना धोकादायक पूल तोडण्याचे काम शनिवारी, १९ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजल्यापासून सुरु झाले. या काळात एक हजारहून अधिक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. सीएसएमटी-भायखळा लोकल वाहतूक १७ तासांनी तर सीएसएमटी-वडाळा लोकल २१ तासांनी पूर्ववत करण्याची वेळ रेल्वे प्रशासनाने रविवारी सकाळी जाहीर केली होती. ब्लॉकच्या काळात मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते भायखळा व हार्बर मार्गावर वडाळा ते सीएसएमटी दरम्यान एकही लोकल धावली नाही. 

असा पाडला पूल     कर्नाक पुलाच्या स्टीलच्या सांगाड्याची लांबी ५० मीटर आणि रुंदी १८.८ मीटर होती.     सांगाड्यात एकूण ७ जोड होते. त्यांचे ४४ तुकडे करण्यात आले. एकावेळी एकच तुकडा उचलण्यात आला.     १८ तुकड्यांचे प्रत्येकी वजन १६ टन होते.     यातील १४ तुकड्यांचे प्रत्येकी वजन ३ टन होते, तर १२ तुकड्यांचे प्रत्येकी वजन १० टन होते.     हे तुकडे उचलण्यासाठी ३५० टन वजनी क्षमतेच्या ३ क्रेन तर ५०० टन वजनी क्षमतेची एक क्रेन होती.     ब्लॉकच्या पहिल्या आठ तासानंतर पुलाच्या सांगाड्याचा मधला भाग पूर्णपणे हटवण्यात आला होता.

 

ते १५ तास ५२ मिनिटे-    मध्य रेल्वेने कर्नाक उड्डाण पूल पाडण्याचे काम शनिवारी रात्री ११ वाजता सुरू केले. -    प्रत्यक्षात हा पूल पाडण्याचे काम रविवारी दुपारी २ वाजून ५२ मिनिटांत पूर्ण करण्यात मध्य रेल्वेला यश आले. -    हा पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेला १५ तास ५२ मिनिटांचा कालावधी लागला आहे. -    पूल पाडून झाल्यानंतर ओव्हर हेड वायर जोडण्याचे काम केल्यावर १५ तास ५२ मिनिटांनी मुख्य मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. 

 

 

 

टॅग्स :लोकलठाणे