गुढीपाडव्याच्या दिवशीही मेगाब्लॉकचे विघ्न कायम; मध्य, पश्चिम मार्गावरील प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 01:04 AM2018-03-18T01:04:39+5:302018-03-18T01:04:39+5:30
रविवार आणि मेगाब्लॉक यांची मुंबईकरांना आता सवय झाली आहे. परंतु १८ मार्च रोजी गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्ष दिन असूनही मुंबईकरांसमोर मेगाब्लॉकचे विघ्न कायम आहे. मध्य रेल्वेवर रविवारी सकाळी १०.५४ ते दुपारी ४.१९ दरम्यान कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे.
मुंबई : रविवार आणि मेगाब्लॉक यांची मुंबईकरांना आता सवय झाली आहे. परंतु १८ मार्च रोजी गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्ष दिन असूनही मुंबईकरांसमोर मेगाब्लॉकचे विघ्न कायम आहे. मध्य रेल्वेवर रविवारी सकाळी १०.५४ ते दुपारी ४.१९ दरम्यान कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ दरम्यान चर्चगेट-मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
रविवारी सकाळी १०.५४ ते दुपारी ४.१९ दरम्यान कल्याणहून सुटणाऱ्या सर्व अप जलद लोकल सेवा कल्याण ते ठाणे दरम्यान अप धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. दरम्यानच्या सर्व स्थानकांवर या लोकल थांबतील. सकाळी १०.१६ ते दुपारी ३.२२ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाºया सर्व डाऊन जलद लोकल निर्धारित थांब्याशिवाय घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. तर, पश्चिम रेल्वे मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ दरम्यान चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील रेल्वेसेवा धिम्या मार्गावरून चालविण्यात येतील. त्यामुळे त्या सर्व स्थानकांवर थांबतील.
हार्बरच्या प्रवाशांना दिलासा
हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी कोणत्याही प्रकारचा ब्लॉक नसेल, त्यामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.