मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 09:37 AM2022-08-06T09:37:31+5:302022-08-06T09:37:44+5:30
रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विविध देखभाल दुरुस्ती कामे करणाऱ्यांसाठी रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि माटुंगा व मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबतील. ठाण्याच्या पलीकडील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद गाड्या मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर मार्ग
पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५पर्यंत (बेलापूर / नेरूळ-खारकोपर लाइन वगळून) मेगाब्लॉक असणार आहे. पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या सीएसटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसटी येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल / बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत ठाणे येथे जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
प. रेल्वेचा दिलासा
पश्चिम रेल्वेकडून रेल्वे रूळ, सिग्नल प्रणालीच्या देखभालीसाठी वसईरोड यार्डच्या अप आणि डाऊन दिवा मार्गावर रविवारी मध्यरात्री १२.१५ ते ३.१५ या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार नसून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.