Join us

डीसी-एसीसाठी शनिवारी मेगाब्लॉक?

By admin | Published: April 05, 2016 2:00 AM

हार्बर मार्गावरील डीसी (१,५00 व्होल्ट डायरेक्ट करंट) ते एसी (२५,000 व्होल्ट अल्टरनेट करंट) परिवर्तन पूर्ण करण्यासाठी मुहूर्त मिळत नसून आता आणखी एक मुहूर्त परिवर्तनाला देण्यात आला आहे

मुंबई : हार्बर मार्गावरील डीसी (१,५00 व्होल्ट डायरेक्ट करंट) ते एसी (२५,000 व्होल्ट अल्टरनेट करंट) परिवर्तन पूर्ण करण्यासाठी मुहूर्त मिळत नसून आता आणखी एक मुहूर्त परिवर्तनाला देण्यात आला आहे. हे काम शनिवारी मध्यरात्री घेण्याचा विचार मध्य रेल्वे करत आहे. हार्बर मार्गावर डीसी ते एसी परिवर्तनासाठी २ एप्रिलच्या मध्यरात्रीचा मुहूर्त देण्यात आला होता. त्यासाठी ब्लॉकचे नियोजन केले आहे. मात्र तांत्रिक कारणांमुळे विद्युत अभियंता विभागाने ब्लॉक रद्द करून परिवर्तन एका आठवड्याने पुढे ढकलले होते. परिवर्तनासाठी आवश्यक असलेली रेल्वे सुरक्षा आयुक्तांची परवानगी न मिळाल्याने हे काम पुढे ढकलण्यात आले होते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र येत्या एक-दोन दिवसांत ही परवानगी मिळाल्यानंतर शनिवारच्या मध्यरात्री परिवर्तनाचे काम पूर्ण करण्याचा विचार करत असल्याची माहिती देण्यात आली. परिवर्तन झाल्यास सध्या ताशी ८0 किमी असलेला लोकलचा वेग वाढून ताशी १00 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. तसेच विजेची बचतही होण्यास मदत मिळेल.