मुंबई : मध्य रेल्वे कर्नाक उड्डाणपूल पाडकामासाठीच्या २७ तासांच्या ब्लॉकदरम्यान शॅडो ब्लॉकमध्ये सुमारे ९०० तासांइतके काम करणार आहे. शॅडो ब्लॉकचे काम ‘नो ट्रेन झोन’मध्ये म्हणजे मुख्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि भायखळादरम्यान तसेच हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वडाळारोडदरम्यान केले जाईल. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, अन्यथा घरीच थांबणे योग्य ठरणार आहे. २७ तासांच्या ब्लॉकदरम्यान शॅडो ब्लॉक्स घेण्यात येणार आहे. ज्यामुळे रेल्वेला भविष्यातील ब्लॉक कालावधीत सुमारे ९०० तासांची बचत करता येईल. यामध्ये अभियांत्रिकीचे ५०५ तास, ओव्हरहेड इक्विपमेंटचे २३५ तास व सिग्नल अँड टेलिकॉमचे १६० तासांचा समावेश आहे. ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी सीएसएमटी, भायखळा, दादर, ठाणे, वडाळारोड व पनवेल स्थानकांवर हेल्पडेस्क सुरू केली आहेत. प्रवाशांच्या फायद्यासाठी अतिरिक्त एटीव्हीएम सुविधा मदतनीस सेवेत असतील. यामध्ये दादर भायखळा, वडाळा, परळ या स्थानकांचा समावेश आहे.
गाड्यांची माहिती यासंबंधी सतत उद्घोषणा याशिवाय शॉर्ट ओरिजिनेशन / टर्मिनेशन, मेल / एक्स्प्रेस गाड्यांचे रीशेड्युलिंग आणि उपनगरीय गाड्यांची माहिती यासंबंधी सतत उद्घोषणा केल्या जात आहेत.ब्लॉकची माहिती आणि त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणात एसएमएसद्वारे आणि मध्य रेल्वेच्या ट्विटर, फेसबुक, कू आणि इन्स्टाग्रामसारख्या अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जात आहेत.