लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देखभाल व दुरुस्ती कामासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार, ७ फेब्रुवारी राेजी मेगाब्लॉक असेल. त्यानुसार, मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा - मुलुंड अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४.०५ यावेळेत मेगाब्लॉक घेण्यात येईल. सकाळी १०.२५ ते दुपारी ३.४४ या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळविल्या जातील आणि सायन व मुलुंड दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील. त्या नियोजित वेळेपेक्षा गंतव्य स्थानावर १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. सकाळी १०.४६ ते दुपारी ३.२६ यावेळेत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि मुलुंड ते दादर स्थानकांदरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील. नियोजित वेळेपेक्षा गंतव्य स्थानावर १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (सीएसएमटी) जाणाऱ्या अप जलद सेवा परळ येथे पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील.
हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल-वाशी अप व डाऊन हार्बर मार्ग येथे सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ यावेळेत (बेलापूर / नेरुळ-खारकोपर मार्गासह) मेगाब्लॉक असेल. सकाळी १०.४९ ते दुपारी ४.०१ दरम्यान पनवेल / बेलापूरहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटीहून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ दरम्यान पनवेल / बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
* सीएसएमटी-वाशी विशेष लाेकल
सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ यावेळेत पनवेलहून ठाणेकडे आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेल / बेलापूरसाठी एकही लाेकल धावणार नाही. याकाळात सीएसएमटी-वाशीसाठी विशेष गाड्या धावतील. ठाणे-वाशी स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.
...............................