लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विविध देखभाल, दुरुस्ती कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार, २१ फेब्रुवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा-मुलुंड अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ४.०५पर्यंत ब्लॉक असेल. याकाळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुटणाऱ्या जलद फेऱ्या धिम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि नियोजित थांब्यावर थांबतील. निर्धारित वेळेपेक्षा या फेऱ्या १५ मिनिटे उशिराने स्थानकांवर पोहोचतील.
हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला-वाशी अप व डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१०पर्यंत मेगाब्लॉक असेल. या कालावधीत सीएसएमटीहून पनवेल / बेलापूर / वाशीसाठी तसेच पनवेल / बेलापूर / वाशी येथून सीएसएमटीच्या दिशेने एकही लाेकल धावणार नाही. मात्र, प्रवाशांच्या साेयीसाठी सीएसएमटी-कुर्ला आणि वाशी-पनवेलसाठी विशेष फेऱ्या चालविल्या जातील.
* पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा
पश्चिम रेल्वेकडून २२ आणि २३ फेब्रुवारी दरम्यानच्या मध्यरात्री वांद्रे टर्मिनस यार्डमध्ये मेगाब्लॉक घेतला जाईल. त्यामुळे रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळेल.
..................