लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य रेल्वेकडून रविवारी उपनगरी भागातील देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल.
मध्य रेल्वे मार्गावर ठाणे-कल्याण दरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर २९ नाेव्हेंबर, रविवारी सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत मेगाब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी ९.३७ ते दुपारी २.४८ पर्यंत सुटणाऱ्या जलद फेऱ्या ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. त्या ठाणे ते कल्याण दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील.
कल्याण येथून सकाळी १०.२६ ते दुपारी ३.१९ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येणार असून कल्याण व ठाणे दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील. मुलुंड येथे अप जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील व निर्धारित स्थानकांवर थांबतील.
* ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवासाची मुभा
हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला-वाशीदरम्यान अप व डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असेल. सीएसएमटी येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ पर्यंत वाशी / बेलापूर /पनवेलसाठी तसेच पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ या वेळेत सीएसएमटीसाठी एकही लाेकल धावणार नाही. ब्लॉककाळात सीएसएमटी - कुर्ला आणि वाशी - पनवेलसाठी विशेष गाड्या चालिवण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० या वेळेत ट्रान्स हार्बर / मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी असणार आहे.