मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी: 'या' मार्गावर आजपासून ४० दिवस 'लोकलहाल', ६०० ते ७०० फेऱ्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 06:47 AM2024-08-27T06:47:12+5:302024-08-27T06:47:46+5:30

ब्लॉकदरम्यान गणेशोत्सव असल्याने ११ ते १७ सप्टेंबर या कालावधीत मार्गिकेचे काम करण्यात येणार नाही, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Megablock will be taken up from 27th August to 6th October to construct sixth track on Western Railway between Goregaon and Kandivali | मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी: 'या' मार्गावर आजपासून ४० दिवस 'लोकलहाल', ६०० ते ७०० फेऱ्या रद्द

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी: 'या' मार्गावर आजपासून ४० दिवस 'लोकलहाल', ६०० ते ७०० फेऱ्या रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान सहावी मार्गिका तयार करण्यासाठी २७ ऑगस्ट ते ६ ऑक्टोबर या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत ६०० ते ७०० लोकलफेऱ्या रद्द करण्यात येणार असल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सांताक्रूझ गोरेगावदरम्यानच्या सहाव्या मार्गिकेच्या कामामुळे २५०० हून अधिक सेवा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे यावेळी वीकेंडला एकूण पाच मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून, प्रत्येक ब्लॉकमध्ये केवळ १३०- १४० गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. हे मेगाब्लॉक १० तासांचे असतील.

मेगाब्लॉकचा कालावधी सुरू झाल्यानंतर पाचव्या, १२ व्या, १९ व्या, २६ व्या आणि ३३ व्या दिवशी हे ब्लॉक घेतले जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाचे दिली. ब्लॉकदरम्यान गणेशोत्सव असल्याने ११ ते १७ सप्टेंबर या कालावधीत मार्गिकेचे काम करण्यात येणार नाही, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

सध्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी अप आणि डाउन अशी एकच मार्गिका आहे. या नव्या मार्गिकेमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी अतिरिक्त मार्गिका मिळणार आहे. विलंबाने धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्या बऱ्याचदा लोकल गाड्यांच्या मार्गिकांवरून चालवल्या जातात; परंतु या नव्या मार्गिकेमुळे लोकल गाड्यांचा आणि पर्यायाने मुंबईकर चाकरमान्यांचा खोळंबा होणार नाही, असा रेल्वेचा दावा आहे. आतापर्यंत वांद्रे टर्मिनस ते गोरेगाव या नऊ किमीच्या सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. सहाव्या मार्गिकेचा दुसरा महत्त्वाचा टप्पा गोरेगाव ते कांदिवली हा आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मार्गिकेचा फायदा काय?

- बिझी उपनगरी रेल्वे मार्ग आणि मुख्य मार्गावरील रहदारीची घनता कमी होईल.

- लोकल गाड्यांच्याही वक्तशीरपणात सुधारणा होईल.

- वांद्रे टर्मिनसवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेससाठी दोन मार्गिका असतील.

- लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिक मिळेल, उपनगरीय वाहतुकीवर या गाड्यांचा ताण येणार नाही.

- जास्त गाड्या चालवण्यासाठी अतिरिक्त माग उपलब्ध असतील.

पश्चिम रेल्वे मार्गावरील ही मार्गिका अपग्रेड करून आम्ही लोकल रेल्वेवरील ताण आणि प्रवाशांची गैरसोय कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. या कामामुळे प्रवाशांची कमी गैरसोय होईल, अशा पद्धतीने कामाची आखणी केली आहे. - विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

Web Title: Megablock will be taken up from 27th August to 6th October to construct sixth track on Western Railway between Goregaon and Kandivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.