मुंबई : विविध दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी ३१ जानेवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येईल.मध्य रेल्वेच्या भायखळा ते माटुंगा अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेर्यंत मेगाब्लॉक असेल. यादरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा येथे डाऊन धिम्या मार्गावर वळविल्या जातील. भायखळा ते माटुंगादरम्यान सर्व स्थानकांवर लाेकल थांबतील. माटुंगानंतर जलद सेवा जलद मार्गावर वळविण्यात येतील.कुर्ला रेल्वे स्थानकावरून अप जलद उपनगरीय लोकल सेवा सकाळी ११.०६ ते दुपारी ३.४५ या वेळेत माटुंगा ते भायखळा दरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि भायखळा रेल्वे स्थानकावरून अप जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील. तर, हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप व डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान सीएसएमटीहून सुटणारी वाशी, बेलापूर, पनवेल डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.१८ ते दुपारी ३.३९ दरम्यान रद्द राहील. पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ पर्यंत सीएसएमटीसाठी एकही लाेकल धावणार नाही. कुर्ला रेल्वे स्थानकावरून विशेष लोकल धावतील.पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते गोरेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान अप डाऊन धिम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ दरम्यान मेगाब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल सेवा बोरीवली, गोरेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान अप डाऊन जलद मार्गांवर वळविण्यात येतील. तसेच यादरम्यान बोरीवली रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक १, २, ३ आणि ४ वरून कोणतीही लाेकल धावणार नाही.
तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 2:27 AM