Join us

मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक; तब्बल ९६ दिवसांनंतर घेण्यात आला मोठा ब्लॉक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 3:11 AM

याआधी मागील रविवारी आंबिवली येथे पादचारी पुलाचे पाडकाम करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला होता.

मुंबई : अत्यावश्यक सेवेतील निवडक कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून मध्य रेल्वे मार्गावर लोकल धावत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घेऊन दुरुस्ती आणि देखभालीची कामे हाती घेतली आहेत. तब्बल ९६ दिवसांनंतर घेण्यात येणारा हा मोठा ब्लॉक आहे.

याआधी मागील रविवारी आंबिवली येथे पादचारी पुलाचे पाडकाम करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मध्य रेल्वेच्या दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर विद्याविहार-मुलुंड दरम्यान रविवारी सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० पर्यंत मेगाब्लॉक असेल. तर, हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशीदरम्यान दोन्ही दिशेकडे सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ ब्लॉक असेल. या मेगाब्लॉकमुळे काही ठाणे व कल्याण लोकल रद्द केल्या जातील. मात्र राज्य शासनाने निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा सेवा चालविण्यात येतील. 

हार्बर मार्गावर विशेष लोकलमध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत ब्लॉक असेल. सकाळी ९.४५ ते दुपारी ३.०० पर्यंत सीएसएमटीहून पनवेलकडे तर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.०० पर्यंत पनवेलहून सीएसएमटीकडे लोकल नसेल. सीएसएमटी- मानखुर्द-सीएसएमटी विशेष लोकल धावतील. 

टॅग्स :मुंबई लोकल