मुंबई - सत्यघटनेवर कोणीही कॉपीराईटचा दावा करू शकत नाही, अशी माहिती देत ‘छपाक’ चित्रपटाची दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी एका लेखकाने ‘छपाक’ची कथा त्याने लिहिलेल्या कथेवर आधारित असल्याचा केलेला दावा फेटाळण्याची विनंती न्यायालयाला केली.
राकेश भारती या लेखकाने उच्च न्यायालयात ‘छपाक’विरुद्ध दावा दाखल केला आहे. त्याने या कथेचे श्रेय आपल्याला दिले जावे, अशी मागणी न्यायालयात केली आहे. भारती यांच्या दाव्यावर मेघना गुलजार यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. ‘हा दावा चुकीचा आहे. कॉपीराईटच्या दाव्याचे उल्लंघन केलेले नाही. जी माहिती सार्वजनिक आहे, तिच्यावर कोणीही कॉपीराईटचा दावा करू शकत नाही,’ असे गुलजार यांनी प्रतिज्ञापत्रत म्हटले आहे.
‘सत्यघटनांवर कोणीही कॉपीराईटचा दावा करू शकत नाही. चुकीच्या हेतूने व प्रसिद्धी मिळविण्याच्या हेतूने हा दावा दाखल केला असून, नाहक चित्रपट प्रदर्शित करण्याच्या मार्गात अडथळा निर्माण करण्यात येत आहे,’ असे प्रतिज्ञापत्रत म्हटले आहे. मेघना गुलजार यांची प्रतिष्ठा खराब करून त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी हा दावा दाखल करण्यात आला, असा आरोप गुलजार यांच्या वकिलांनी लेखकावर केला आहे. न्या. एस. सी. गुप्ते यांच्यासमोर या दाव्यावर सुनावणी होती. न्यायालयाने या दाव्यावरील सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली आहे. राकेश भारती यांनी हा चित्रपट प्रदर्शित करण्यास स्थगिती द्यावी, अशी अंतरिम मागणी न्यायालयात केली आहे. दीपिका पदुकोण हिची मुख्य भूमिका असलेला ‘छपाक’ 10 जानेवारी रोजी चित्रपटगृहांत झळकणार आहे. भारती यांनी केलेल्या दाव्यानुसार, या चित्रपटाची मूळ संकल्पना त्यांची आहे. त्या स्क्रिप्टला त्यांनी ‘ब्लॅक डे’ असे तात्पुरते नाव दिले होते.
इंडियन मोशन पिक्चर प्रोडय़ुसर असोसिएशनकडे फेब्रुवारी 2015मध्ये या स्क्रिप्टची नोंदणीही केली होती. तेव्हापासून या स्क्रिप्टवर काम करत आहे व वेगवेगळ्या निर्मात्यांशी व कलाकारांशी संपर्क साधत होतो, असे भारती यांनी दाव्यात म्हटले आहे. ‘मात्र काही न टाळण्यासारख्या घटनांमुळे हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. या चित्रपटाची संकल्पना ‘फॉक्स स्टार स्टुडिओ’ला समजावून सांगण्यात आली होती आणि छपाक चित्रपटाचे प्रोडक्शन हाऊस हे फॉक्स स्टार स्टुडिओच आहे,’ असे भारती यांनी दाव्यात म्हटले आहे.