Join us

"दहा पक्ष आणि दहा बाप बदलणारी ही सरड्याची...", सत्तारांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2022 4:26 PM

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर राष्ट्रवादीने सडकून टीका केली आहे.

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ शब्दांत टीका केली. सत्तार यांनी सुळे यांना दिलेल्या शिवीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना मंत्री सत्तार यांची जीभ घसरली. सुळेंबद्दल प्रश्न विचारला असता सत्तार त्यांनी कॅमेरासमोरच खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केली. याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चांगलीच आक्रमक झाली असून सत्तारांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे म्हटले आहे. 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबुब शेख यांनी माध्यमांशी संवाद साधला असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी एक व्हिडीओ संदेश जारी केला आहे. या व्हिडीओत शेख यांनी मंत्री सत्तारांचा एकेरी शब्दांत उल्लेख करून आपला संताप व्यक्त केला आहे. शेख यांनी सत्तारांवर निशाणा साधताना म्हटले, "दहा पक्ष आणि दहा बाप बदलणारी ही सरड्याची औलाद अत्यंत खालच्या भाषेत सुप्रियाताईंबद्दल बोलत आहे." अशा शब्दांत शेख यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर सडकून टीका केली. सत्तारांच्या विधानाचा निषेध करताना शेख यांनी सत्तारांचा चांगलाच समाचार घेतला. "तुझ्या सत्तेची मस्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिरवल्याशिवाय राहणार नाही", असे शेख यांनी अधिक म्हटले. 

"सत्तारच्या दौऱ्यामध्ये सत्तेची मस्ती उतरवणार"दरम्यान, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रभर सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवण्याचे आवाहन शेख यांनी केले आहे. "संपूर्ण महाराष्ट्रभर अब्दुल सत्तारच्या पुतळ्याला जोडे मारुन त्याच्या पुतळ्याचे दहन करावे. तसेच सत्तारच्या दौऱ्यामध्ये सत्तेची मस्ती उतरवण्याची तयारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने करावी. याला धडा शिकवल्याशिवाय राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शांत बसू नये", असे आवाहन शेख यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले आहे. 

नेमकं काय घडलं? कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पन्नास खोक्यावरुन टीका केली होती. "पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का? असा सवाल सुळे यांनी सत्तार यांना केला होता. यावर सत्तारांनी उत्तर देताना म्हटलं, ते तुम्हाला हवे आहेत का? यावर सुळे यांनी प्रतिक्रिया देताना तुमच्या पन्नास खोके आले असतील म्हणूनच तुम्ही आम्हाला ऑफर करत आहात, असं प्रत्युत्तर सुळे यांनी दिले. या प्रत्युत्तराला उत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुळे यांनी शिवी दिल्याचे समोर आले आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मंत्री सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिवी दिली त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

 

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारसुप्रिया सुळेअब्दुल सत्तार