मुंबई : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर पावसाने तलाव क्षेत्रांवरही कृपा दाखविली़ शुक्रवार रात्रीपासून मुसळधार पाऊस तलावांमध्येही बरसू लागला़ त्यामुळे एका दिवसात तब्बल ६५७ दशलक्ष लीटर जलसाठा वाढला आहे़ पाणीटंचाईच्या काळात ही वाढही समाधानकारक असल्याचे मत पालिका प्रशासनाने आज व्यक्त केले़गेल्या वर्षी झालेला अपुरा पाऊस आणि या वर्षी मान्सून लांबल्यामुळे तलावांमध्ये खडखडाट झाला आहे़ प्रमुख तलावांनी तळ गाठला असून, राखीव जलसाठ्यातून पाणी उचलण्याची वेळ पालिकेवर आली आहे़ त्यामुळे आॅगस्ट २०१५ पासून सुरू असलेली २० टक्के पाणीकपात कायम ठेवण्यात आली आहे़ मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मागील दोन वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळाची स्थिती निर्माण झाली. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलाव आणि धरणांच्या क्षेत्रात पाऊस झाला नसता, तर मुंबईचे पाणीसंकट मराठवाड्याप्रमाणे गंभीर झाले असते.दरम्यान, गेल्या २४ तासांत मुंबई व ठाणे जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे़ मुसळधार पावसाने तलाव क्षेत्रातही खाते उघडले आहे़ त्यामुळे कित्येक दिवसांनंतर तलावांमधील पाण्याची पातळी आज वाढली़ मुंबईतील विहार आणि तुळशी तलावात दिवसभरात अनुक्रमे १८८ मि़मी़ व १४० मि़मी़ पाऊस झाला आहे़ प्रमुख तलावांमध्येही पाण्याची पातळी वाढू लागली आहे़ (प्रतिनिधी)पाणीकपात कायमपावसाने आज तलावांमध्ये चांगली हजेरी लावली़ मात्र, असा पाऊस आणखी दहा ते १५ दिवस तलाव क्षेत्रात पडल्यास पाणीकपात रद्द करण्याबाबत विचार केला जाईल़, तोपर्यंत ही कपात कायम राहणार असल्याचे, उपायुक्त सुधीर नाईक यांनी सांगितले़हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वे वीसएक मिनिटांच्या फरकाने धावत असल्याने रेल्वे फलाटांवर तुफान गर्दी झाली होती. यात प्रामुख्याने सीएसटी, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, अंधेरी, वांद्रे, वडाळा या रेल्वे स्थानकांचा समावेश होता.पश्चिम द्रुतगती महामार्गावर महिंद्रा अँड महिंद्रा येथे वाहतूककोंडी झाली होती. परिणामी, बोरीवलीपासून मालाडपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.मुलुंड आणि पवई येथे मुसळधार पावसामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण झाल्याने वाहतूक धिम्या गतीने होत होती.लाल बहादूर शास्त्री मार्गावर कुर्ला पश्चिमेकडे फिनिक्स मॉल येथेही मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.मुंबई शहरात ३, पूर्व उपनगरात २ आणि पश्चिम उपनगरात ४ अशा एकूण ९ ठिकाणी पाणी तुंबल्याची तक्रारी महापालिका नियंत्रण कक्षाकडे प्राप्त झाल्या. या ठिकाणावरील पाणी उपसण्यासाठीच्या सूचना संबंधित विभागाला मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात आल्या.शहरात ३, पूर्व उपनगरात ३ आणि पश्चिम उपनगरात २ अशा एकूण ८ ठिकाणी घरांचा भाग कोसळल्याच्या घटना घडल्या.शहरात ७, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात ३ अशा एकूण ११ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.शहरात ७, पूर्व उपनगरात १२ आणि पश्चिम उपनगरात १७ अशा एकूण ३६ ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. या दुर्घटनांत सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही.
तलाव क्षेत्रात मेघराजा बरसला
By admin | Published: June 26, 2016 4:20 AM