लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : कोकणातील गणेशोत्सव काळात मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर १४२ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर या गाड्या फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे गणेशभक्तांवर मेहेरनजर करीत आणखी ६० जादा फेऱ्या सोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. पनवेल ते सावंतवाडी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी आणि मुंबई ते चिपळूण या मार्गावर जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेतर्फे कोकण रेल्वे मार्गावर पनवेल-सावंतवाडी ही विशेष गाडी क्रमांक ०११८९/०११९० १९ आॅगस्टपासून ९ सप्टेंबरपर्यंत दर शनिवारी धावणार आहे. ही गाडी पनवेलहून शनिवारी सायंकाळी ७.४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२० वाजता सावंतवाडीला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी दर शनिवारी सकाळी ८ वाजता सावंतवाडीहून सुटेल व पनवेलला सायंकाळी ६.२० वाजता पोहोचेल. या गाडीला रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप हे थांबे देण्यात आले आहेत. १८ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी ही विशेष गाडी (क्र. ०१०४३/०१०४४) दर शुक्रवारी मध्यरात्री १.१० वाजता सुटेल व करमाळीला सकाळी ११ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी दर शुक्रवारी दुपारी १ वाजता सुटेल व टिळक टर्मिनसला रात्री १२.२० वाजता पोहोचेल. ठाणे, पनवेल, रोहा, चिपळुण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ येथे ही गाडी थांबणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी गाडी (क्र. ०१०४५/०१०४६) २१ आॅगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत दर सोमवारी मध्यरात्री १ वाजून १० मिनिटांनी सुटणार असून, करमाळीला सकाळी ११ वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी दर शुक्रवारी दुपारी १ वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनसला रात्री १२.२० वाजता पोहोचेल. ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ येथे ही गाडी थांबेल. मध्य रेल्वे यावेळी पनवेल ते सावंतवाडी विशेष गाडी सोडणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या भक्तांकरिता एस. टी. महामंडळ, खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्याही मोठ्या प्रमाणात प्रवासी सेवा पुरविणार आहेत. तरीही दरवर्षी गणेशोत्सवासह सर्वच हंगामात कोकणवासीयांसाठी कोकण रेल्वेकडून सोडल्या जाणाऱ्या गाड्यांचे प्रमाण वाढत आहे. कोकण रेल्वेने एकप्रकारे कोकणवासीयांवर मेहेरनजर केल्याचीच चर्चा होत आहे. खास फेरी : मुंबई-चिपळूण मार्गावरही रेल्वेमुंबई-चिपळूण ही विशेष गाडी (क्र. ०११७९/०११८०) २० आॅगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत मंगळवार, गुरूवार व रविवारी पहाटे ५ वाजता मुंबईहून सुटून चिपळूणला सकाळी १०.२० वाजता येईल. चिपळूणहून त्याच दिवशी सायंकाळी ५.४५ वाजता सुटेल व रात्री ११.४० वाजता मुंबईला पोहोचेल. दादर, ठाणे, पनवेल, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव, वीर, करंजाडी, खेड येथे ही गाडी थांबणार आहे.
कोकण रेल्वेची गणेश भक्तांवर मेहेरनजर
By admin | Published: July 17, 2017 12:24 AM