- योगेश बिडवईमुंबई : देशातील पहिल्या १०० विद्यापीठांत स्थान मिळवू न शकलेल्या मुंबई विद्यापीठीच्या विधी विभागातील पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश परीक्षेत सात बहुपर्यायी प्रश्न उत्तरांसह छापल्याची चूक कबूल करणा-या ‘पेपर सेटर’वर विद्यापीठाने कोणतीही कारवाई केली नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ‘लोकमत’ला विद्यापीठाची त्याबाबतची पत्रे उपलब्ध झाली आहेत.सात प्रश्नांचा एक पर्याय ठळकपणे देण्यात आला होता. त्याची विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर विद्यापीठाने सर्व परीक्षार्थींना प्रत्येक प्रश्नासाठी दोन याप्रमाणे एकूण १४ गुण सरसकट दिले होते. ३ जून २०१७ रोजी मुंबई विद्यापीठाने ‘एलएलएम’ची प्रवेश परीक्षा घेतली होती. त्यात सात प्रश्नांचा प्रत्येकी एक पर्याय ठळक अक्षरांत छापण्यात आला होता. तो योग्य पर्याय असल्याचे परीक्षार्थींचे म्हणणे होते. प्रश्नपत्रिकेतील तफावती व चुकांची महाविद्यालयांनी परीक्षा सुरू असताना विद्यापीठातील मुख्य नियंत्रण कक्षाकडे तक्रार केली. प्रवेश परीक्षेच्या पेपर सेटर डॉ. स्वाती रौतेला यांनी त्यांच्याकडून संबंधित चुका झाल्याचे कबूल केले. मुद्रित शोधनाच्या वेळी नजरचुकीने संबंधित चुका दुरूस्त झाल्या नाहीत, याची कबुली देत त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. त्यानंतर परीक्षा व मूल्यमापन मंडळाची बैठक झाली. बैठकीत विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन सात प्रश्नांचे प्रत्येकी दोन असे १४ गुण देण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला.विशेष म्हणजे ५० गुणांच्या या प्रवेश परीक्षेत १४ गुण हे उत्तीर्ण होण्याएवढे होते. त्यामुळे प्रश्न परीक्षेतील चुका गंभीर स्वरुपाच्या होत्या. वास्तविक शैक्षणिक दर्जावर प्रश्नचिन्ह लागलेल्या मुंबई विद्यापीठाने स्वत:ची लाज वाचविण्यासाठी पेपर सेटरवर कारवाई करणे अपेक्षित होते. तसेच पुन्हा नव्याने परीक्षा घेण्याची गरज होती. मात्र परीक्षा व मूल्यमापन मंडळाने परीक्षार्थींना १४ गुण देण्याचा नामुष्कीचा निर्णय घेताना रौतेला यांच्यावर कोणतीही कारवाई का केली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.>प्रभारी प्र-कुलगुरूंचे दुर्लक्ष : ‘लोकमत’ने प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. व्ही. एन. मगरे यांच्याशी संपर्क साधला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांना या संदर्भातील माहिती व्हॉटस् अप केली, मात्र त्यावरही त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. मुंबई विद्यापीठाला सध्या पूर्ण वेळ कुलुगुरू नसताना वास्तविक डॉ. मगरे यांनी संबंधित प्रकरणी त्वरीत कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र ते याकडे दुर्लक्ष करत असल्याचे प्राध्यापकांचे म्हणणे आहे.>शिक्षेऐवजी दिले बक्षीस : विद्यापीठाने स्वाती रौतेला यांना केवळ अभयच दिले नाही तर २ फेब्रुवारी २०१८ रोजी पत्र जारी करत रौतेला यांची विधी विभागाच्या अभ्यास मंडळावर अंतरिम नियुक्ती केली. परीक्षा, निकाल गोंधळामुळे विद्यापीठाची संपूर्ण देशात प्रतिमा खराब झाली असतानाही एलएलएमच्या प्रवेश परीक्षेतील चुकांची गंभीरपणे दखल घेण्यास प्रशासन तयार नसल्याचेच हे निदर्शक आहे. ‘उमासा’ (युनिव्हर्सिटी आॅफ मुंबई अॅकेडमिक स्टाफ असोसिएशन) संघटनेनेही कुलसचिवांकडे नियमभंग करणा-या पेपर सेटरवर कारवाई करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.>‘उमासा’ संघटनेची तक्रारप्रवेश परीक्षेतील चुकांप्रकरणी कारवाई करण्यासाठी आम्ही कुलसचिवांना पत्र दिले. मात्र त्यानंतरही काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. अधिकारी निर्ढावले आहेत, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. नियमभंग करणा-यांना पाठीशी घालण्यात येत आहे. विशेष म्हणजे चुका करणा-या पेपर सेटरला अभ्यास मंडळावर घेण्यात आल्याचेही समजते. त्यामुळे व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे.- डॉ. बालाजी केंद्रे, उमासा संघटना
नामुष्की आणणाऱ्या प्राध्यापिकेवर मुंबई विद्यापीठाची मेहेरनजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 6:14 AM