मेहतांनी स्वीकारली आयुक्तपदाची सूत्रे
By admin | Published: April 28, 2015 02:05 AM2015-04-28T02:05:49+5:302015-04-28T02:05:49+5:30
विकास आराखड्याच्या वादाहून सीताराम कुंटे यांची गच्छंती झाल्यानंतर अखेर पर्यावरण खात्याचे प्रधान सचिव अजय मेहता यांनी सोमवारी महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली.
समस्या सोडविण्यास प्राधान्य : सेनेच्या राजकारणाचे आव्हान
मुंबई : विकास आराखड्याच्या वादाहून सीताराम कुंटे यांची गच्छंती झाल्यानंतर अखेर पर्यावरण खात्याचे प्रधान सचिव अजय मेहता यांनी सोमवारी महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. महानिर्मिती आणि महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकपदासह ३० वर्षांचा प्रशासकीय अनुभव गाठीशी असलेले मेहता यांच्यासमोर विकास आराखड्यासह मुंबईच्या नागरी समस्यांच्या प्रश्नांचे आव्हान आहे. महापालिकेतील अंतर्गत राजकारणामुळे शिवसेनेसारख्या राजकीय पक्षाला त्यांना अंगावर घ्यावे लागणार आहे.
मुंबई महापालिका आयुक्तपदाचे सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलाताना मेहता म्हणाले, की राज्य सरकारने नियुक्ती केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो़ हे पद मोठ्या जबाबदारीचे असल्याची जाणीव आहे़
त्यामुळे मुंबईकरांना गुणवत्तापूर्वक नागरी सेवा-सुविधा पुरविण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न असेल. मात्र शहराच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार आहोत़ विकास आराखड्याचा अभ्यास अद्याप केलेला नाही़ चार महिन्यांमध्ये हा आराखडा तयार करण्याचे आव्हान आहे़ यासाठी मुंबईकरांचे सहकार्य अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले. आयुक्तपद स्वीकारताच ते लगेच मान्सूनपूर्व कामाच्या तयारीला लागले. (प्रतिनिधी)