मुंबई - कमला मिल प्रकरणी राजकीय दबाव टाकणाऱ्या नेत्याचे नाव मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी दिले आहे. संजय निरुपम पत्रकार परीषदेत म्हणाले की मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांनी ‘त्या’ राजकीय नेत्यांचे नाव जाहीर करावे. कोणत्या नेत्याने तुमच्यावर राजकीय दबाव टाकला हे त्यांनी उघडपणे जाहिर करावे असे मी त्यांना आवाहन करत आहे. कोण हा राजकीय नेता आहे हे सर्व जनतेला कळले पाहिजे. माझे असे म्हणणे आहे की अजोय मेहता यांनी हे वक्तव्य जनतेची दिशाभूल करण्यासाठीच केलेले आहे. कमला मिल आग प्रकरणापासून सगळ्यांचे लक्ष दुर्लक्षित करण्यासाठीचे आहे. ही त्यांची स्टंटबाजी आहे. पण आम्ही मात्र हे प्रकरण लावून धरणार आहोत. तसेच मोजोचे सहापैकी पाच मालक नागपुरमधील आहेत, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. "मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार फक्त खालच्या स्तरावर नसून उच्च स्तरावर म्हणजेच आयुक्तांच्या कार्यालयातसुद्धा आहे. कमला मिल प्रकरणाला संपूर्णतः महानगरपालिका आणि अजोय मेहताच जबाबदार आहे. महानगरपालिकेत खुप मोठा भ्रष्टाचार आहे. अजोय मेहता यांनी स्वताहून राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजोय मेहता यांचा राजीनामा घ्यावा. पालिका आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करू नये कारण पालिका आयुक्त या घोटाळ्यात सामील आहेत, मग ते चौकशी कसे करतील. या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन किंवा सीबीआय चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे, असेही निरूपम यांनी पुढे सांगितले.निरूपम पुढे म्हणाले की, " मोजोजचे मालक ६ पैकी ५ जण नागपूरचे आहेत, हे नागपूर आणि भाजपा कनेक्शन आहे. त्यामुळेच त्यांना पकडण्यासाठी टाळाटाळ होत आहे. फक्त युग पाठक या एकालाच पकडले आहे. त्याला पकडण्यासाठी सुद्धा ९ दिवस लावले. मोजोजच्या एका मालकाचे वडील हे हवालाचे मोठे दलाल आहेत. त्यांचे दिल्लीत भाजपा नेत्यांशी घनिष्ट संबंध आहेत म्हणून हा तपास लांबवला जात आहे, असा आम्हाला दाट संशय आहे.
मेहता यांनी राजकीय दबाव टाकणाऱ्या नेत्याचे नाव जाहीर करावे - संजय निरुपम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2018 9:10 PM