मेहुल चोक्सीच्या पोलीस प्रमाणपत्राबाबत चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 05:49 AM2018-08-05T05:49:29+5:302018-08-05T05:49:50+5:30
पंजाब नॅशनल बॅँकेच्या १४ हजार कोटींचा घोटाळा करून परदेशात पलायन केलेल्या मेहुल चोक्सीला विशेष शाखेकडून गेल्या वर्षी १४ मार्चला चारित्र्य पडताळणीचा अहवाल देण्यात आल्याची कबुली मुंबई पोलिसांनी शनिवारी दिली.
मुंबई : पंजाब नॅशनल बॅँकेच्या १४ हजार कोटींचा घोटाळा करून परदेशात पलायन केलेल्या मेहुल चोक्सीला विशेष शाखेकडून गेल्या वर्षी १४ मार्चला चारित्र्य पडताळणीचा अहवाल देण्यात आल्याची कबुली मुंबई पोलिसांनी शनिवारी दिली. मात्र त्या वेळी त्याच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नव्हता. तरीही हा अहवाल देण्यामागे काहींचा सहभाग होता का, या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.
नीरव मोदीच्या साथीने हजारो कोटींचा घोटाळा करून परदेशात पलायन केलेल्या चोक्सीने कॅरेबियातील अॅटिग्वा देशाचे नागरिकत्व घेतले आहे. त्याबाबत भारताने नाराजी दर्शविल्यानंतर अॅटिग्वा सरकारने भारताच्या परराष्टÑ विभाग व पोलिसांच्या अहवालानंतर प्रमाणपत्र दिल्याचा गौप्यस्फोट केला. यामध्ये मुंबई पोलिसांकडून चारित्र्य पडताळणीबाबत दाखला दिल्याचे जाहीर झाले. पोलिसांनी सुरुवातीला त्याचा इन्कार केला होता. मात्र शनिवारी त्यांनी पडताळणी अहवाल दिल्याचे मान्य केले. याबाबतच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, चोक्सीचा पासपोर्ट नंबर ९३३९६७३२ हा असून १० सप्टेंबर २०१५ रोजी तत्काळ प्रकारातून घेतला आहे. त्यानंतर गेल्या वर्षी २३ फेबु्रवारीला पोलीस पडताळणीसाठी विभागीय पासपोर्ट कार्यालयात त्याने अर्ज केला होता. १० मार्चला मलबार हिल पोलिसांनी त्याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नसल्याचा अहवाल विशेष शाखेकडे पाठविला. त्यानंतर विभागाने तो १४ मार्चला पारपत्र कार्यालयाकडे पाठविला होता.
>तपास सुरू
आर्थिक घोटाळ्याप्रकरणी चोक्सीवर ३१ जानेवारीला गुन्हा दाखल झाल्यानंतर २३ फेबु्रवारीला त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला. चोक्सीचा पडताळणीबाबतचा अहवाल देण्यामागे षड्यंत्र होते का, यात कोण सहभागी होते, याचा तपास करण्यात येत आहे.