मेहुल चोक्सीचा भारतात येणास नकार; इडीला अँटिग्वाला येण्याचे निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 07:37 PM2018-11-18T19:37:39+5:302018-11-18T19:38:12+5:30
इडीने त्याच्याविरोधात मुंबईतील न्यायालयात फरारी घोषित करण्यासाठी याचिका दाखल केली होती.
मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 13 हजार कोटींचा चुना लावून परदेशात पलायन केलेल्या मेहुल चोक्सी याने भारतात येण्यास स्पष्ट नकार दिला असून हवे असल्यास इडीनेच अँटिग्वाला येण्यास सांगितले आहे.
हिरे व्यापारी नीरव मोदीसह पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या मेहुल चोक्सी याच्या वकिलाने न्यायालयात चोक्सीचा तब्येत ठीक नसल्याचे कारण दिले होते. इडीने त्याच्याविरोधात मुंबईतील न्यायालयात फरारी घोषित करण्यासाठी याचिका दाखल केली होती.
यावेळी चोक्सीचे वकील, संजय अबोट यांनी चोक्सीची तब्येत खराब असल्याचे कारण दिले. तसेच त्याचा जबाब नोंदवायचा झाल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सींग किंवा इडीच्या अधिकाऱ्यांनी अँटीग्वाला जाऊन नोंदवावे असेही वकिलाकडून सांगण्यात आले. अन्यथा तीन महिन्यांची वाट पहा, असेही अबोट यांनी न्यायालयाला सांगितले.
जेव्हा चोक्सी याची तब्येत सुधारेल तेव्हा तो भारतात येईल, असे सांगत इडीची याचिका रद्द करण्याची विनंती केली.