Join us

अधिवेशन संपले; मेहुणे... मेहुणे... मेहुण्यांचे पाहुणे... ते पेन ड्राइव्ह..!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 10:05 AM

मराठीतले विनोदी साहित्यही या अधिवेशनाच्या निमित्ताने संपन्न झाले

अतुल कुलकर्णी

प्रिय नेते मंडळीहो,नमस्कार नेहमीप्रमाणे अधिवेशन उत्साहात पार पडलं. आरोप-प्रत्यारोपही जोरात झाले. मजा आली. तुम्ही सर्व मान्यवर नेत्यांनी अधिवेशनात केलेल्या भाषणांमुळे मराठी भाषा समृद्ध झाली. त्यामुळेच मराठी भाषेत अनेक चांगल्या शब्दांची भर आपण सगळ्यांनी घातली. मागच्या अधिवेशनात म्याऊ... म्याऊ... शब्दाची नवी ओळख कोकणवासीय सुपुत्रांनी करून दिली होती. त्यांनी आधी म्याऊ... म्याऊ... आणि नंतर इकडे धाऊ... की तिकडे धाऊ... असेही करून दाखवले; पण मराठी भाषा समृद्ध झाली, हेही नसे थोडके... यावेळी अनेक नवनव्या शब्दांची भर आपण टाकली. नव्या संकल्पना उदयाला आणल्या. सगळ्यात मोठी भर पडली ते साक्षात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकापाठोपाठ काढलेल्या पेनड्राइव्हमुळे.  त्याला लगेच माध्यमांनी ‘पेनड्राइव्ह बॉम्ब’ असे नामकरण करून नव्या अस्सल मराठी शब्दाची भर टाकली. त्यामुळे हा शब्द खूप गाजला... हेडलाइनही ठरला... त्यासोबतच एकमेकांवर टोकाचे आरोप कसे करायचे..? दमदारपणे समोरच्याला नामोहरम कसे करायचे...? खोटे बोल पण रेटून बोल... हे कौशल्य कसे साधायचे..? तारस्वरात कसे मुद्दे मांडायचे...? आपल्या बोलण्यातून परसेप्शन कसे तयार करायचे...? या व अशा सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तर सर्वपक्षीय नेत्यांची भाषणे आवर्जून बघितली पाहिजेत. त्याचा अभ्यास केला पाहिजे. यावर आमचे आता दुमत राहिले नाही. आपण केवळ मराठी भाषाच समृद्ध केली नाही तर अज्ञानी जनतेला आपल्या अलौकिक अनुभवातून जे काही ज्ञान मिळवले व मुक्त हस्ते वाटण्याचे काम केले त्याची इतिहासात नोंद होईल.

मराठीतले विनोदी साहित्यही या अधिवेशनाच्या निमित्ताने संपन्न झाले. स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली. ज्या गतीने भाजपाची प्रगती झाली त्यापेक्षा जास्त गतीने प्रवीण दरेकर यांची प्रगती झाली असा नवा शोधसुद्धा याच अधिवेशनात त्यांनी लावला. त्यावर सगळ्यांनी बाके वाजवून, दाद दिली, त्याबद्दल आम्हाला तुमचा फार अभिमान आहे. याच आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याकडे इडीचे पाहुणे आले आणि दुनियादारीमधल्या मेहुणे... मेहुणे... मेहुण्यांचे पाहुणे... हा डायलॉग एकदम चर्चेत आला... पण त्यावर ठाकरेंनी त्यांच्या खास ठाकरे शैलीत दिलेली उत्तरे उपहास आणि शालजोडीतले यांचा अनोखा संगम ठरली. त्यावर फडणवीसांनी जाता जाता का होईना ‘टोमणे बॉम्ब’ या नव्या शब्दाची भर मराठी साहित्यात टाकलीच. काही असो, तुम्ही सगळ्यांनी जोरात अधिवेशन गाजवले. त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन...या सगळ्यात काही फुटकळ गोष्टी करायच्या राहून गेल्या. राज्यातल्या शाळांची आणि पोरांची अवस्था गंभीर बनली आहे. कोण, कुठे, काय शिक्षण घेत आहे याचा काही पत्ता नाही. शाळेतून मुलाच्या गळतीने टोक गाठले आहे. त्यामुळे आज नाही; पण आणखी काही वर्षांनी ही पिढी जेव्हा वयात येईल तेव्हा ते पेनड्राइव्ह बॉम्ब, टोमणे बॉम्बऐवजी आणखी कसले बॉम्ब फोडतील याची कल्पना नाही. गावागावातले रस्ते पुरते उखडून गेले आहेत. एसटीच्या संपामुळे ग्रामीण भागात खाजगी वाहतुकीची मनमानी शिगेला गेली आहे. सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये कुठे डॉक्टर्स नाहीत तर कुठे औषधांचा पत्ता नाही... पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने नवनवे उच्चांक गाठणे सुरू केले आहे. यासारखे अनेक विषय आहेत. यावर आपण विस्ताराने चर्चा केली नाही ते बरेच झाले. नाही तर त्याच्या बातम्या कोणी छापल्या नसत्याच... ते जाऊ द्या... एक मात्र छान झाले, तुम्ही सगळ्यांनी ‘काश्मीर फाइल्स’ पाहिला. तो चांगला की वाईट यावर सभागृहात मंथन केलं. मध्यांतरानंतर तो बोअर आहे असं जयंतराव म्हणाले. हा फार महत्त्वाचा विषय होता. त्यामुळे यावर चर्चा झाली ते एकदम बेस्ट झालं... आता सगळे आपापल्या मतदारसंघात जा... जनतेच्या योजनांवर तुम्ही कसे भांडलात, कसे मुद्दे मांडले, हे जनतेला पटवून द्या... आणि तुम्हाला मुंबई सारख्या शहरात फक्त ७० लाखांत घर कसं पदरात पाडून घेतलं त्याच्याही कथा सांगा... जय हिंद, जय महाराष्ट्र...!आपलाच,बाबूराव

टॅग्स :मुंबईदेवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेमहाराष्ट्र