Join us  

बांगलादेशींना माेकळे रान; एजंटला अटक, बांगलादेशींना भारतात घुसवून कामधंद्यालाही लावायचा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 7:13 AM

बांगलादेशी नागरिकांकडून पैसे घेत त्यांना भारतात अवैधरीत्या प्रवेश मिळवून देत वेगवेगळ्या ठिकाणी कामधंद्याला लावणाऱ्या एजंटचा गाशा गुंडाळण्यात पोलिसांना शनिवारी यश मिळाले आहे.

मुंबई : बांगलादेशी नागरिकांकडून पैसे घेत त्यांना भारतात अवैधरीत्या प्रवेश मिळवून देत वेगवेगळ्या ठिकाणी कामधंद्याला लावणाऱ्या एजंटचा गाशा गुंडाळण्यात पोलिसांना शनिवारी यश मिळाले आहे. त्याचे नाव अक्रम नूरनबी शेख (२६) असे असून गुन्हे शाखेच्या कक्ष ६ ने शिवडी रेल्वेस्थानकावरून त्याच्या मुसक्या आवळत महिला साथीदारालाही अटक केली आहे.

भारतात घुसखोरी करून वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी व इतर परदेशी नागरिकाविरुद्ध कारवाई करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेकडून प्रयत्न सुरू असतात. कक्ष ६ कार्यालयाकडून त्यांच्याबाबतची माहिती संकलित करण्याचे काम सुरू होते. या दरम्यान ७ डिसेंबर रोजी बांगलादेशी नागरिकांना भारतात येण्यासाठी मदत करणारा एजंट शिवडी स्थानकाबाहेर  आल्याची माहिती प्रभारी निरीक्षक रवींद्र साळुंखे यांना मिळाली.

त्यानुसार त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचला आणि शेख याला ताब्यात घेतले. त्याच्या सखोल चौकशीमध्ये तो स्वतः मूळ बांगलादेशी नागरिक असून भारत बांगलादेश सीमा कोणत्याही कायदेशीर परवानगी न घेता अवैधरीत्या पार करून आल्याचे त्याने कबूल केले.

याप्रकरणी त्याच्या विरोधात आर ए के मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. त्याची कसून चौकशी केल्यावर त्याची एक महिला साथीदार लीमा शहाजान अलदर (२६) हिला देखील गजाआड करण्यात आले असून, या दोघांनाही न्यायालयाने १२ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.