मुंबई- 'मेलोडिज ऑफ द मास्टर्स' या आगळ्यावेगळ्या सांगितिक मैफलीच्या माध्यमातून दिग्गज संगीतकार ओ. पी. नय्यर आणि शंकर जयकिशन यांना मानवंदना देण्यात येणार आहे. या निमित्ताने प्रेक्षकांना भारतीय सिनेसृष्टीच्या सुवर्णकाळातील गाजलेल्या गाण्यांची मैफल अनुभवायला मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.
'लेके पेहला पेहला प्यार...', 'तारिफ करू क्या उसकी...', 'प्यार हुआ इकरार हुआ...' यांसारख्या जुन्या गाजलेल्या गाण्यांचा सुवर्णकाळ अनुभवण्याची संधी दादरकर रसिकांना मिळणार आहे. ७ जूनला रात्री ८ वाजता श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात एकेएस क्रिएशन्स आणि रघुलीला एंटरप्रायझेसतर्फे आयोजित 'मेलोडिज ऑफ द मास्टर्स' हा कार्यक्रम होणार आहे. गायिका केतकी भावे जोशी, सारेगमप लिटील चॅम्प स्वरा जोशी, गायक डॉ. जय आजगावकर आणि नचिकेत देसाई या कार्यक्रमामध्ये गाणी सादर करणार आहेत. कमलेश भडकमकर यांनी या कार्यक्रमाचे आरेखन केले आहे. तर आदित्य बिवलकर आणि अभिजीत जोशी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम सादर होत आहे. सागर साठे कार्यक्रमाचे वाद्यवृंद संयोजन करणार आहेत. त्यांच्या अॅकॉर्डीयन वादनाची झलकसुद्धा रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. झंकार कानडे, दीप वझे, विजू तांबे, किशोर नारखेडे, आर्चिस लेले, निलेश परब, हनुमंत रावडे आणि सिद्धार्थ कदम यांचा या कार्यक्रमात सहभाग असणार आहे. मंदार खराडे निवेदनाद्वारे ओ. पी. नय्यर आणि शंकर जयकिशन यांचा प्रवास उलगडणार आहेत.