Join us  

मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य ठाकरेंच्या भेटीला, समान नागरी कायद्याबाबत मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 12:28 PM

Uniform Civil Code: केंद्र सरकार समान नागरी कायदा लागू करण्याबाबत आग्रही असताना मुस्लीम समाजाकडून मात्र त्याला विरोध केला जात आहे. विरोध नेमका कशासाठी हे सांगण्यासाठी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

मुंबई - केंद्र सरकार समान नागरी कायदा लागू करण्याबाबत आग्रही असताना मुस्लीम समाजाकडून मात्र त्याला विरोध केला जात आहे. विरोध नेमका कशासाठी हे सांगण्यासाठी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. समान नागरी कायद्याला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी कायम समर्थन दर्शविले होते. आता उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेत आहेत हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात समान नागरी कायद्याला पाठिंबा दर्शवला होता. मात्र, या कायद्याचा हिंदूंना त्रास होणार नाही ना, असाही प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या सदस्यांनीही बुधवारी ठाकरे यांची भेट घेत आपले म्हणणे त्यांच्यासमोर मांडले. 

ठाकरे यांनी आमचे सर्व मुद्दे ऐकून घेतले आहेत. हा कायदा केवळ मुस्लीम समाजासाठी नाही, तर इतर अनेक जाती-जमातीसाठी अडचणीचा ठरू शकतो. त्यासाठी देशातील सर्व पक्षाच्या प्रमुखांची आम्ही भेट घेणार आहोत. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांची भेट घेऊ, अशी प्रतिक्रिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे पदाधिकारी मोहम्मद अहमद खान दर्याबादी यांनी दिली. 

या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील मिळाला नाही. उद्धव ठाकरे शिवसेनेकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र या भेटीमुळे जोरदार राजकीय चर्चा सुरु झाली आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरे