Join us

गावदेवी भुमिगत पार्कींगवर स्मार्टसिटी सल्लागार समिती सदस्यांचाच आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 5:12 PM

वादग्रस्त ठरत असलेल्या गावदेवी मैदानाखालील पार्कींगवर आता स्मार्टसिटीच्या सल्लागार समिती सदस्यांनीच आक्षेप घेतला आहे. हे काम करतांना सल्लागार सदस्यांना विश्वासात घेतले गेले नसून या प्रकल्पाच्या आजूबाजूच्या रहिवाशांना देखील विश्वासात घेतले गेले नसल्याचा ठपका सल्लागार समितीच्या सदस्या सुलक्षणा महाजन यांनी ठेवला आहे.

ठाणे : ठाणे स्टेशन परिसरातील पार्कींगची समस्या सोडविण्यासाठी स्मार्टसिटीच्या माध्यमातून गावदेवी मैदानाखाली भुमिगत पार्कींगचे काम सध्या ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुरु आहे. परंतु या कामावर आता स्मार्टसिटीच्या सल्लागारांनीच आक्षेप घेतला आहे. मंगळवारी झालेल्या स्मार्टसिटीच्या बैठकीत नगरचना तज्ञ तथा स्मार्टसिटीच्या सल्लागार समितीच्या सदस्या सुलक्षणा महाजन यांनी आक्षेप घेत, या प्रकल्पावर कोट्यावधींचा खर्च करुन काय उपयोग, त्याचा पालिकेला काय फायदा होणार, प्रकल्प उभारतांना सल्लागारांना विश्वासात का घेतले गेले नाही, असे मुद्दे उपस्थित करीत पालिका प्रशासनाची कान उघाडणी केल्याची माहिती सुत्रांनी दिली.                   ठाणे स्टेशन परिसरात सध्या नौपाडा भागातील गावदेवी मैदानाखाली भुमिगत पार्कींग प्लाझाचे काम सुरु आहे. परंतु या पार्कींग प्लाझाच्या बाबतीत यापूर्वी दक्ष नागरीक डॉ. महेश बेडेकर यांनी आक्षेप घेत, न्यायालायत धाव देखील घेतली आहे. तसेच मागील महिन्यात कॉंग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी देखील आक्षेप नोंदवत या पार्कींगच्या कामामुळे आजूबाजुच्या इमारतींना मोठा धोका संभावू शकणार असल्याचे सांगितले आहे. तसेच कोणतीही नैसर्गिक आपत्ती आल्यास ३ किमी. परिसरात मोकळे मैदान असावे असेही नमुद आहे. परंतु या कामामुळे मैदानाची तेवढी क्षमता राहिल का? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली होती.दरम्यान या कामाबाबत आता स्मार्टसिटीच्या सल्लागार समितीमधील सदस्य सुलक्षणा महाजन यांनी देखील आक्षेप घेतला आहे. मुळात हे काम करतांना सदस्यांना विश्वासात घेण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आजूबाजूच्यांना देखील विश्वासात घेतले गेले नाही, त्यातही हा प्रकल्प उभारत असतांना त्याचा पालिकेला काय फायदा होणार याची माहिती घेतलेली नाही, १०० ते १५० गाड्यांकरीता एवढा कोट्यावधींचा निधी खर्च केला जाणार आहे. त्यातून वर्षाकाठी पालिका संबधीतांना ३ कोटीही देणार त्यामुळे या प्रकल्पाचा नेमका उपयोग काय असा सवाल उपस्थित करीत या प्रकल्पावरच आक्षेप नोंदविला आहे. 

टॅग्स :ठाणेठाणे महापालिकापार्किंग