पोहणा-यांची संख्या घरबसल्या कळणार; पोहायला जायची वेळ ठरविणे सुलभ होणार 

By सचिन लुंगसे | Published: August 23, 2022 07:08 PM2022-08-23T19:08:41+5:302022-08-23T19:08:55+5:30

पहिल्या टप्प्यात ६ हजार नागरिकांना दिली जाणार वार्षिक सदस्यता, महानगरपालिकेच्या जलतरण तलावांची सदस्यता आता ऑनलाईन

Membership of municipal swimming pools now online in Mumbai | पोहणा-यांची संख्या घरबसल्या कळणार; पोहायला जायची वेळ ठरविणे सुलभ होणार 

पोहणा-यांची संख्या घरबसल्या कळणार; पोहायला जायची वेळ ठरविणे सुलभ होणार 

googlenewsNext

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी देखील विविध स्तरिय प्रयत्न करीत असते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून क्रीडांगण, योग कार्यशाळा, उद्याने, खुल्या व्यायामशाळा इत्यादींच्या सोयी नागरिकांना उपलब्ध करुन देण्याबरोबरच महानगरपालिकेचे जलतरण तलाव देखील मुंबईकरांच्या सेवेत कार्यरत आहेत. याच जलतरण तलावांची सदस्यता मिळविणे, आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. यासाठी निमित्त ठरले आहे.

आजपासून ऑनलाईन करण्यात येत असलेली जलतरण तलाव सदस्यता नोंदणी प्रक्रिया ! अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या हस्ते या ऑनलाईन प्रक्रियेचे लोकार्पण आज करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला उप आयुक्त (उद्याने) श्री. किशोर गांधी, संचालक (माहिती व तंत्रज्ञान) तथा सहाय्यक आयुक्त श्री. शरद उघडे, या प्रक्रियेसाठीचे समन्वयक श्री. संदीप वैशंपायन, लेखा परिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकारी श्री. सचिन गांगण यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचीही उपस्थिती होती.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलतरण तलावांची सातत्याने योग्यप्रकारे राखली जाणारी निगा, तेथील स्वच्छता आणि सुव्यवस्था यामुळे या तलावांची वार्षिक सदस्यता मिळविण्यासाठी अनेक मुंबईकर नागरिक नेहमीच इच्छुक असतात. मात्र, ही प्रक्रिया यापूर्वी छापील अर्ज भरुन पारंपारिक पद्धतीने घेणे, हे घडाळ्याच्या काट्याशी बांधलेले आयुष्य असणा-या मुंबईकरांना जिकिरीचे होत असे. ही बाब लक्षात घेऊन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार ही सर्व प्रक्रिया आजपासून ऑनलाईन करण्यात येत आहे.

पहिल्या टप्प्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ज्या ४ जलतरण तलावांची सदस्यत्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येत आहे, त्यामध्ये सर्वप्रथम दहिसर परिसरातील श्री मुरबाळीदेवी जलतरण तलाव येथील प्रक्रिया आजपासून ऑनलाईन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद लाभण्यास सुरुवात झाली आहे. यानंतर बुधवार दिनांक २४ ऑगस्ट २०२२ पासून चेंबूर (पूर्व) येथील ‘जनरल अरुणकुमार वैद्य जलतरण तलाव’ (ऑलिंपिक) आणि कांदिवली परिसरातील ‘सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलाव’ (ऑलिंपिक) या दोन्ही जलतरण तलावांची सदस्यत्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार आहे. तर दादर परिसरातील महात्मा गांधी स्मारक ऑलिंपिक जलतरण तलावाची ऑनलाईन सदस्यत्व नोंदणी गुरुवार दिनांक २५ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणार आहे. या चारही तरण तलावांसाठी एकूण ६ हजार व्यक्तिंना ऑनलाईन पद्धतीने सदस्यत्व नोंदणी दिली जाणार आहे, अशी माहिती उप आयुक्त श्री. किशोर गांधी यांनी दिली आहे.

आजपासून सुरु करण्यात आलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलतरण तलावांच्या ऑनलाईन सदस्यत्व प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :-

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावर (होम पेज) जलतरण तलाव वार्षिक सदस्यत्व नोंदणीची ‘लिंक’ देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर उघडणा-या वेब पेजवर अत्यंत सोपा व सुटसुटीत ऑनलाईन अर्ज आहे. हा अर्ज भरताना इतर प्राथमिक माहितीसह आपला आधार क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे.

वरीलनुसार अर्ज भरुन सबमिट केल्यानंतर ऑनलाईन शुल्क भरणा करावा लागेल. दादर, कांदिवली व चेंबूर येथील जलतरण तलावांचे वार्षिक सदस्यता शुल्क हे रुपये १० हजार १०० इतके आहे. तर दहिसर येथील जलतरण तलावांचे वार्षिक सदस्यता शुल्क हे रुपये ८ हजार इतके आहे. या शुल्कामध्ये शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक इत्यादींना वार्षिक शुल्कामध्ये ५० टक्के सवलत असणार आहे.

वरीलनुसार ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यानंतर व ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरणा केल्यानंतर ३० दिवसांच्या आत जलतरण तलावाच्या कार्यालयात वैद्यकीय प्रमाणपत्र, आधारकार्ड व शुल्क भरल्याचा पावती क्रमांक सादर करावयाचा आहे. या कागदपत्रांच्या पडताळणीनंतर अर्जदाराचे सभासदत्व सक्रिय (Active) केले जाणार आहे. यानंतर ‘फेस रिकग्निशन’साठी सभासदाची छायाचित्र नोंदणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे केली जाणार आहे.

यापूर्वी जलतरण तलावांच्या सदस्यांना दररोज ४५ मिनिटे पोहण्याचा कालावधी दिला जात असे. आता या कालावधीत १५ मिनिटांची वाढ करुन हा कालावधी सर्वांसाठी १ तास असा करण्यात आला आहे.

जलतरण तलावाच्या ठिकाणी सभासदाच्या आगमन – निर्गमनावेळी ‘फेस रिगग्निशन’द्वारे स्वयंचलित पद्धतीने सभासदांची नोंदणी होणार आहे.  यामुळे एखादा सदस्य निर्धारित एका तासाच्या कालावधीपेक्षा अधिक तास पोहत असल्यास, त्या व्यक्तिच्या वार्षिक सदस्यत्वाच्या कालावधीतून अतिरिक्त पोहण्याचा कालावधी स्वयंचलित पद्धतीने वजा होणार आहे. यामुळे अधिक व्यक्तिंना जलतरण तलावाचा लाभ घेणे शक्य होण्यासोबतच सुटीच्या कालावधीत जलतरण तलावांवर होणारी गर्दी नियंत्रित करणे शक्य होणार आहे.

यापूर्वी सदस्यत्व घेताना अर्जदारास पोहण्याचा ४५ मिनिटांचा स्लॉट नमूद करणे आवश्यक असायचे. मात्र, आता संबंधित प्रक्रिया व जलतरण तलावावरील आगमन – निर्गमन प्रक्रिया संगणकीय पद्धतीने होणार असल्याने सदस्य जलतरण तलावाच्या कामकाजच्या वेळेदरम्यान कोणत्याही वेळी येऊन एक तासापर्यंत पोहणे शक्य असणार आहे.

एखाद्या सदस्याला पोहायला जायचे असल्यास त्यावेळी जलतरण तलावावर किती सदस्य पोहण्याचा आनंद घेत आहेत आणि त्याचवेळी आणखी किती सदस्यांना तिथे प्रवेश दिला जाऊ शकतो, याची माहिती ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. यामुळे घरातून निघण्यापूर्वी ती माहिती ऑनलाईन पद्धतीने बघून त्यानंतर पोहायला जाण्याचा निर्णय अंतिम करता येणार आहे. यामुळे देखील जलतरण तलावांवरील गर्दी नियंत्रित करण्यासोबतच सदस्यांना देखील घरबसल्या अद्ययावत माहिती उपलब्ध असणार आहे.

Web Title: Membership of municipal swimming pools now online in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.