मुंबईत अण्णाभाऊंचे स्मारक होणार, घाटकोपरच्या चिरागनगरात करणार उभारणी : अध्यक्षपदी राज्यमंत्री कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 05:54 AM2017-09-20T05:54:14+5:302017-09-20T05:54:21+5:30
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी नेते, नामवंत कवी-लेखक आणि वंचितांचा आवाज बुलंद करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईत उभारण्यात येणार असून, त्यासाठी सामाजिक न्यायराज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती नेमली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी नेते, नामवंत कवी-लेखक आणि वंचितांचा आवाज बुलंद करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईत उभारण्यात येणार असून, त्यासाठी सामाजिक न्यायराज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती नेमली आहे. मातंग समाजाचे नेते मधुकरराव कांबळे हे या समितीचे उपाध्यक्ष व सदस्य सचिव असतील.
घाटकोपर परिसरातील चिरागनगरात अण्णाभाऊंचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी हे स्मारक उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच या स्मारकाच्या उभारणीसंदर्भात बैठक झाली. त्यामध्ये स्मारक परिसराचा विकास, स्मारक परिसरातील भाडेकरूंचे पुनर्वसन, विकासकाची नियुक्ती आदींबाबत चर्चा झाली आणि समिती स्थापन करून स्मारकाच्या कामाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
समितीमध्ये सदस्य म्हणून आ. सुधाकर भालेराव, आ. डॉ. संजय कुटे, आ. श्रीकांत देशपांडे, संजय कुटे, आ. राम कदम, तसेच नगरसेवक अमित गोरखे यांच्यासह विविध शासकीय संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे.
>क्रांतिवीर साळवे स्मारकाचे भूमिपूजन जयंतीदिनी व्हावे
क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन, येत्या त्यांच्या जयंतीला करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे महापालिका आयुक्तांना दिले.
पुण्यातील संगमवाडी भागात वस्ताद लहुजी साळवे यांचे स्मारक करण्याविषयी आज बैठक झाली. वस्ताद लहुजी साळवे यांच्या कार्याची पुढील पिढीला माहिती व्हावी, म्हणून स्मारक उभारण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. या वेळी अन्न व नागरीपुरवठामंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खा. अनिल शिरोळे, पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे, सचिव रामदास साळवे आदी उपस्थित होते.
>मधुकर कांबळे यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा
अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष व सदस्य सचिव मधुकर कांबळे यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
भाजपामधून काँग्रेसमध्ये गेलेले कांबळे आता भाजपात परतणार आहेत.