बाळासाहेबांचे स्मारक महापौर बंगल्यातच
By admin | Published: February 4, 2016 04:15 AM2016-02-04T04:15:49+5:302016-02-04T04:15:49+5:30
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी दादर पश्चिम येथील महापौर निवासाची जागा देण्याचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका प्रशासनाला पाठविले आहे़
मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी दादर पश्चिम येथील महापौर निवासाची जागा देण्याचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका प्रशासनाला पाठविले आहे़ त्यामुळे ही पुरातन वास्तू शासनाच्या ताब्यात देण्याची वेळ पालिकेवर आली आहे.
शिवाजी पार्कवर शिवसेना प्रमुखांचा स्मृती चौथरा बांधण्यात आला आहे़ या चौथऱ्याचा विस्तार करण्याचा शिवसेनेचा विचार आहे़ परंतु सागरी क्षेत्र नियंत्रण कायद्यामुळे या चौथऱ्याच्या विस्ताराला परवानगी मिळत नाही़ त्यामुळे शिवसेना प्रमुखांचे भव्य स्मारक बांधण्याची मागणी शिवसेनेने केली़ यासाठी एका समितीचीही स्थापन झाली़ मात्र स्मारकासाठी योग्य जागा सापडत नव्हती़ अखेर महापौर निवास हीच उत्तम जागा असल्याचे निश्चित झाले़
त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी ही जागा पालिकेला शासनाच्या ताब्यात देण्याची सूचना पत्राद्वारे केली आहे़ याबाबत आयुक्तांना विचारले असता, मुख्यमंत्र्यांचे पत्र आले असून ही जागा शासनाच्या ताब्यात देण्यासाठी प्रस्ताव मंजूर करावा लागेल़ त्यानंतर ही जागा
ट्रस्टकडे हस्तांतरीत केल्यानंतर त्यांच्या काय मागण्या आहेत? हे लक्षात घेऊन अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)