- मनोहर कुंभेजकरमुंबई - देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त काल विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात दीप कमल फाउंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी लिहिलेल्या कविता आणि गीतांसह त्यांच्या अनेक आठवणींना मान्यवरांनी उजाळा दिला.
राज्याचे सांस्कृतिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अँड.आशिष शेलार यांनी उत्तर प्रदेश विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांचा 'अटल सन्मान' देऊन गौरव केला.कार्यक्रमाचे समन्वयक व मुंबई भाजपचे उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
महाना यांनी वाजपेयी यांच्या अनेक आठवणी त्यांच्या वक्तव्यातून जिवंत केल्या. त्यांनी सांगितले की, ते जेव्हा त्यांच्या गाडीत बसायचे, तेव्हा मला त्यांचा ड्रायव्हर झाल्याचं आंतरिक समाधान होत होते. विद्यापीठाने मला डी.लिट. पदवी दिली, पण हा 'अटल सन्मान' ही माझ्यासाठी त्या डॉक्टरेट पदवीपेक्षा ही मोठी उपलब्धी आहे.
महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री .मंगलप्रभात लोढा यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून अटलजींच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला. मंत्री लोढा म्हणाले की, अटलजी म्हणाले होते की, 'अंधार दूर होईल, सूर्य उगवेल, कमळ फुलेल...', आज त्यांचे हे विधान सर्वत्र खरे होताना दिसत आहे.
मंत्री आशिष शेलार म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयींचे महाराष्ट्र आणि विशेषत: मुंबईवर खूप प्रेम होते. मुंबईत झालेल्या एका अधिवेशनात त्यांनी महाराष्ट्राची प्रसिद्ध पुरणपोळी खाण्याची मागणी केली होती. ते पहिले पंतप्रधान होते ज्यांनी मराठी नाटक पाहण्यासाठी मुंबईत येण्याची आणि गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यावर उतरुन दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली, एवढेच नाही, तर पंतप्रधान असताना त्यांना गुडघ्याचे ऑपरेशन करण्यासाठी त्यांनी जगभरातील हॉस्पिटल सोडून थेट मुंबईला आले.
यावेळी चित्रपट अभिनेते शेखर सुमन, टीव्ही कलाकार शैलेश लोढा, मराठी अभिनेते तुषार दळवी आणि किशोर कदम आदींनी अटलजींच्या कविता सादर केल्या.बोरिवलीचे नवनिर्वाचित भाजप आमदार संजय उपाध्याय म्हणाले की, अटलजींच्या स्वप्नांचा भारत घडवण्याची आणि भारताचा शाश्वत सांस्कृतिक वारसा जतन आणि सुशोभित करण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर आहे.
यावेळी अभिनेते शेखर सुमन यांनी पंतप्रधान असताना अटलजींनी त्यांचा ताफा थांबवल्यानंतर कशी मिठी मारली होती याची आठवण करून दिली.तर माजी उपमहापौर अरुण देव, माजी मंत्री भाई गिरकर यांनीही अनेक प्रेरणादायी आठवणी सांगितल्या.
यावेळी अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमरजीत मिश्रा यांनी उपस्थितांचे आभार मानले.