चेंबूरकरांनी जागविल्या ऋषी कपूर यांच्या मिरवणुकीतील आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 01:12 AM2020-05-01T01:12:07+5:302020-05-01T01:12:19+5:30
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले. यामुळे सर्व क्षेत्रांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबई : बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले. यामुळे सर्व क्षेत्रांमधून हळहळ व्यक्त होत आहे. ऋषी कपूर यांच्या निधनामुळे चेंबूरमधील रहिवाशांनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले दु:ख व्यक्त केले. तसेच कपूर कुटुंबीयांचा प्रसिद्ध आर.के. गणपतीच्या मिरवणुकीतील ऋषी कपूर यांच्या आठवणी जागविल्या.
कपूर कुटुंबीय आणि चेंबूर यांचे पूर्वीपासूनच घट्ट नाते होते. ऋषी कपूर यांचे वडील राज कपूर हे मुंबईत स्थायिक झाले त्यावेळेस चेंबूर येथे त्यांनी आर.के. स्टुडिओची निर्मिती केली. या आर.के. स्टुडिओमध्ये अनेक चित्रपटांचे तसेच जाहिरातींचे चित्रीकरण व्हायचे. आर.के. स्टुडिओमध्ये गणपती व रंगपंचमी सण अत्यंत उत्साहाने साजरे होत असत. यावेळी बॉलिवूडमधील सर्व दिग्गज कलाकार आवर्जून उपस्थित राहत. आर.के. स्टुडिओच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक ही मुंबईतील प्रमुख विसर्जन मिरवणुकांपैकी एक व आकर्षणाचा केंद्रबिंदू होती. या विसर्जन मिरवणुकीत संपूर्ण कपूर कुटुंबीय उत्साहात सहभागी होत असे. यामुळे त्यांना पाहायला चेंबूरच्या रस्त्यांवर नागरिक तोबा गर्दी करीत. या मिरवणुकीत ऋषी कपूर यांचे बेधुंद नाचणे चेंबूरवासीयांच्या आजही स्मरणात आहे. त्यांच्या याच आठवणी चेंबूरवासीयांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या.
>आर.के. स्टुडिओच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक निघाली की, चेंबूरच्या रस्त्यांवर तोबा गर्दी होत असे. ‘ए, ऋषी कपूर आलाय, गणपती मिरवणूक बघायला चला’ असे घरोघरी आवाज ऐकू यायचे. ऋषी कपूरदेखील जमलेल्या गर्दीला अभिवादन करत मिरवणुकीत सहभागी व्हायचे. ढोलांच्या ठेक्यावर ऋषी कपूर नाचायला लागले की सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होई. यामुळे कपूर कुटुंबीय व चेंबूर यांचे वषार्नुवर्षांचे एक वेगळेच नाते होते. यापुढे ऋषी कपूर यांना विसर्जन मिरवणुकीत कधीच पाहायला मिळणार नाही याचे दु:ख होत आहे.
- अनिकेत ओव्हाळ,
रहिवासी, चेंबूर