Join us

स्मृतिभ्रंश आजारावरील उपचारांसाठी ‘केईएम’मध्ये मेमरी क्लिनिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:08 AM

मुंबई : स्मृतिभ्रंश अर्थात सातत्याने विस्मरण होण्याचा आजार जडलेल्या रुग्णांवरील वैद्यकीय उपचारांसाठी बृहन्मुंबई महापालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय म्हणजेच ...

मुंबई : स्मृतिभ्रंश अर्थात सातत्याने विस्मरण होण्याचा आजार जडलेल्या रुग्णांवरील वैद्यकीय उपचारांसाठी बृहन्मुंबई महापालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय म्हणजेच के. ई. एम. रुग्णालयामध्ये मेमरी क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या हस्ते या वैद्यकीय सेवेचे लोकार्पण करण्यात आले.

सध्या बाह्य रुग्णसेवा तत्त्वावर ही उपचार पद्धती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. भविष्यात त्याचे काळजी केंद्र (डे केअर सेंटर) मध्ये रूपांतर करण्याचे नियोजन असल्याची माहिती या लोकार्पण प्रसंगी सुरेश काकाणी यांनी दिली. यावेळी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, विभागप्रमुख डॉ. संगीता रावत व इतर मान्यवर उपस्थित होते.

स्मृतिभ्रंश हा आजार मेंदूवर परिणाम करणाऱ्या रोगांमुळे होऊ शकतो. काही अपवादात्मक प्रसंगी पौष्टिक आहार किंवा जीवनसत्त्वाची कमतरता, अंतःस्रावी विकार, इलेक्ट्रोलाइट असंतुलन, संक्रमण, औषधांचा विपरित परिणाम किंवा मानसशास्त्रीय परिस्थिती यासारख्या घटकांमुळे देखील हा आजार जडण्याची शक्यता असते. या आजाराचे एकूण स्वरुप पाहता, वृद्धत्वाकडे झुकलेल्या वयोगटामध्ये बहुतांशी स्मृतिभ्रंश आढळून येतो.

या सर्व बाबी लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने परळ स्थित राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयात मेमरी क्लिनिक सुरू केले आहे. या केंद्रामध्ये स्मृतिभ्रंश ग्रस्त रुग्णांवर बाह्य सेवा तत्त्वावर उपचार करता येणे शक्य होणार आहे. सदर मेमरी क्लिनिक हे औषधोपचार देण्यासह स्मृतिभ्रंशावरील उपचारासाठी इतर वैद्यकीय पद्धतींचा अवलंब देखील करणार आहे. म्हणजेच ते बहुउपचार पद्धती (मल्टीडिसीप्लिनरी) असणारे तज्ज्ञ केंद्र आहे. याठिकाणी रुग्ण तसेच त्यांची काळजी घेणा-यांना मनोवैज्ञानिक साहाय्य मिळेल. रुग्णांसाठी औषधोपचार, मानसोपचार, संज्ञानात्मक पुनर्वसन यासारख्या वैद्यकीय सेवा पुरवल्या जातील. स्मृतिभ्रंशांच्या रुग्णांना एकाच ठिकाणी सर्व वैद्यकीय सेवा मिळाव्यात यादृष्टिने त्याचे योग्य निदान, मूल्यमापन आणि व्यवस्थापन हे सर्व या मेमरी क्लिनिकमधून उपलब्ध करून दिले जाणार आहे. केईएम रुग्णालयाच्या मेंदूविकारशास्त्र विभागाद्वारे हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे.

भविष्यात डे केअर सेंटर करणार

केईएम रुग्णालयातील या मेमरी क्लिनिकमध्ये प्रारंभी बाह्यरुग्ण सेवा दिली जाणार आहे. भविष्यात डे केअर सेंटर (काळजी केंद्र) सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. जेणेकरुन, डे केअर सेंटरमध्ये येणा-या रुग्णांची दिवसभर काळजी घेतली जाईल व त्यांचे काळजीवाहक नातेवाईक/ परिचित/ स्नेही हे दिवसभरात आपली दिनचर्या व्यतीत करू शकतील. एकूणच, स्मृतिभ्रंश ग्रस्त रुग्णांची, त्यांच्या कुटुंबाची कार्यक्षमता सुधारणे आणि रुग्णांचे जीवनमान वाढवणे, या दिशेने महानगरपालिका प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.