मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरून मुंबई ते पुणे, मुंबई ते नाशिक या मार्गावर धावणारी वंदे भारत ट्रेनच्या धर्तीवर बनवण्यात आलेली पहिली मेमू गाडी कळवा कारशेडमध्ये दाखल झाली आहे. या गाडीच्या चाचण्या पुढील आठवड्यात घाट भागात घेतल्या जातील. त्या यशस्वी झाल्या तर मुंबई ते पुणे आणि मुंबई ते नाशिक मार्गावर लोकलऐवजी मेमू चालविण्यात येईल, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.मुंबई ते पुणे आणि मुुंबई ते नाशिक या मार्गावर लोकल चालविणे शक्य नसल्याने येथे तसेच मुंबई ते बडोदा या मार्गावर मेमू चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर वंदे भारत ट्रेनच्या धर्तीवर मेमूची चाचणी घेण्यात येईल. दोन्ही मार्गांवर वंदे भारत ट्रेन पद्धतीची एक एसी लोकल आणि एक मेमू चाचणी लवकरच सुरू करण्यात येईल.मेमूमध्ये २ हजार ६१८ प्रवासी प्रवास करू शकतात. यातील ७४४ प्रवासी बसून प्रवास करू शकतात. मेमू १८ डब्यांची असेल. प्रति तास ११० ते १३० किमीचा वेग असलेल्या मेमूत टॉक बॅक यंत्रणा, स्टेनलेस स्टीलचा वापर, आधुनिक बसण्याची व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रवाशांसाठी उद्घोषणा यंत्रणा आणि जीपीएस असेल.
मुंबई ते नाशिक, मुंबई ते पुणे लोकलऐवजी मेमू धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 1:33 AM