ठाणे : गेल्या काही महिन्यांपासून रांगेत रिक्षाचे भाडे घेण्यावरून वारंवार भिडणाऱ्या महिला आणि पुरुष रिक्षाचालकांचा वाद अखेर शनिवारी नौपाडा पोलीस ठाण्यात पोहोचला. या वादामुळे रिक्षा चालवणे ही पुरुष चालकांची मक्तेदारी असल्याचे काही रिक्षाचालकांच्या वागण्यातून दिसले. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून रिक्षा चालवणाऱ्या महिलांनी दिवसेंदिवस वाढलेल्या अश्लील शेरेबाजीला कंटाळून अखेर संतोष रोंबाडे या रिक्षाचालकाविरोधात तक्रार नोंदविली. त्यानुसार, त्याला अटक केली असून, त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.ठाण्यात आठ महिन्यांपासून काही महिला रिक्षा चालवत आहेत. त्यातील तक्रारदार आणि अन्य सहा महिला रिक्षाचालक या वर्तकनगर, शास्त्रीनगर या आजूबाजूच्या परिसरात राहत असून त्या नौपाडा, गावदेवी ते शिवाईनगर-वर्तकनगर अशा शेअरिंगने रिक्षा चालवतात. त्यांचा रिक्षा स्टॅण्ड गावदेवी येथे असून तेथे प्रवासी घेण्यासाठी त्या महिलाही पुरुष चालकांसोबत या स्टॅण्डवर रांगेत उभ्या राहतात. २७ एप्रिलला सकाळी तक्रारदार आणि सहा महिला रिक्षाचालक प्रवासी भरण्यासाठी या रिक्षा स्टॅण्डवर उभ्या असताना, रिक्षाचालक रोंबाडे यानेही तेथे रिक्षा उभी केली. आम्हाला पाहून त्याने शेरेबाजी करताना, आता यांच्यामुळे आम्हाला घरी भांडी घासावी लागणार नाही तर भीक मागावी लागणार आहे. तसेच शिवीगाळ करून अश्लील शेरेबाजी केली. तसेच, वाहतूक पोलिसांनी पकडल्यावर दंडाची पावती दिल्यावर तो लव्ह लेटर दिले, असे हिणवून आम्हाला दाखवत असे. वारंवार त्याच्या होणाऱ्या या त्रासाला कंटाळून अखेर या महिला रिक्षाचालकांनी एकत्रित येऊन नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून रोंबाडे याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)
महिला-पुरुष रिक्षाचालक भिडले
By admin | Published: May 01, 2017 6:58 AM