अरुण वाघमोडे ।
अहमदनगर : लॉकडाऊनमुळे घरात बसलेल्या पुरुषमंडळींचा राग सध्या घरातील महिलांवर निघत आहे़ क्षुल्लक करणांवरून पत्नीवर ओरडणे, मारहाण, घटस्फोटाची धमकी देणे़ महिलांवरील अशा शारीरिक व मानसिक छळाच्या घटना गेल्या पंधरा ते वीस दिवसांत अनेक कुटुंबात सुरू झाल्या आहेत़ महिलांसाठी कार्यरत असलेल्या नगर शहरातील दिलासा व सखी केंद्रात दररोज २० ते २५ पीडित महिला फोन करून आपली व्यथा मांडत आहेत़अडचणीच्या काळात गुण्यागोविंदाने राहण्याऐवजी काही कुटुंबात वाद सुरू झाले आहेत़ यात सासरी नांदत असलेल्या महिलांना सर्वाधिक त्रास सुरू झाला आहे़ दिलासा व सखी केंद्रात तक्रार करणाऱ्या विवाहित महिलांचेच सर्वाधिक प्रमाण आहे़ लॉकडाउनमुळे कार्यालयात येऊन तक्रार करणे शक्य नसल्याने पीडित महिला फोन करून तक्रारी नोंदवित आहेत़
दिलासा सेलमध्ये दररोज पंधरा ते वीस तर सखी केंद्रात सहा ते दहा असे तक्रारीचे प्रमाण आहे़ पोलीस प्रशासनाचा दिलासा सेल तसेच महिला व बालविकास विभागामार्फत चालविण्यात येणारे वन स्टॉप सेंटर (सखी केंद्र) कार्यरत आहे़स्मृती इराणी यांच्या सूचनाकेंद्रीय महिला व बालविकासमंत्री स्मृती इराणी यांनी देशातील वन स्टॉप सेंटर व्यवस्थापकांची ८ एप्रिलला बैठक घेतली़ पीडित महिलांच्या तक्रारींचे कसे निवारण करावे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले़महिलांवरील अत्याचारांत कठोर कारवाई - गृहमंत्रीमुंबई : लॉकडाऊनच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही विकृत मनोवृत्तीचे पुरुष महिलांवर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारींची अतिशय गंभीर दखल घेऊन कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.देशमुख म्हणाले, या काळात आपल्याला कोण अटकाव करणार असा उद्दामपणा करीत महिला हिंसाचाराचे प्रकार केले जात आहेत. एकट्या स्त्रियांना त्रास देणे, त्यांचा विनयभंग करणे असे प्रकार जिथे घडतील तिथे कुठलाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाई केली जाईल. घरगुती हिंसाचाराच्या (डोमेस्टिक व्हायलन्स) घटनांचीही अतिशय गंभीर दखल घेतली जाईल. स्त्रियांचा छळ केल्यास पोलिसांनी अत्यंत कठोर कारवाई करावी असे आदेश आपण दिले आहेत.