नैराश्याला दूर सारण्यासाठी पुरुषांचे अनोखे ‘समर्पण’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 03:12 AM2018-11-19T03:12:04+5:302018-11-19T03:12:31+5:30

पती-पत्नी एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर बऱ्याच प्रकरणांमध्ये अपत्यांपासूनही दूर राहावे लागते, अशा परिस्थितीत पतींना आपल्या अपत्यांची भेट न होणे ही अत्यंत दु:खद अवस्था असते.

 Men's unique 'dedication' to overcome depression | नैराश्याला दूर सारण्यासाठी पुरुषांचे अनोखे ‘समर्पण’

नैराश्याला दूर सारण्यासाठी पुरुषांचे अनोखे ‘समर्पण’

Next

-  जागतिक पुरुष दिन

मुंबई : पती-पत्नी एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर बऱ्याच प्रकरणांमध्ये अपत्यांपासूनही दूर राहावे लागते, अशा परिस्थितीत पतींना आपल्या अपत्यांची भेट न होणे ही अत्यंत दु:खद अवस्था असते. मात्र, अनेक प्रकरणांमध्ये ही मनस्थिती वर्षानुवर्षे तशीच राहिल्यामुळे पुरुषांमध्ये नैराश्यावस्था येते. यावर उपाय म्हणून जागतिक पुरुष दिनाच्या निमित्ताने वास्तव फाउंडेशनने अनोखा मार्ग शोधून काढला आहे. अशा नैराश्याच्या उंबरठ्यावर असणा-या पुरुषांसाठी ‘समर्पण’ संस्थेच्या सहकार्याने विशेष उपक्रमाचे आयोजन केले असून, त्याद्वारे नैराश्य दूर सारण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
वास्तव फाउंडेशनने आपल्या मुलांपासून ताटातूट झालेल्या आणि त्यामुळे नैराश्यात असणा-या पुरुषांकरिता पाऊल उचलले आहे. घाटकोपर येथील समर्पण संस्थेच्या साहाय्याने थॅलेसेमियाग्रस्त लहानग्यांना आधार म्हणून हे पुरुष रक्तदान करणार आहेत. मात्र, हे रक्तदान तात्पुरत्या स्वरूपाचे नसून, वर्षभरात कायमस्वरूपी पद्धतीने हे कार्य करण्यात येणार आहे. या माध्यमातून एकटे पडणा-या पुरुषांना लहानग्यांचा सहवास, सोबत लाभल्याने त्यांचे नैराश्य कमी करण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे करण्यात येणार आहे, अशी माहिती वास्तव फाउंडेशनने दिली.
यंदा या दिनानिमित्त सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी १० ते सायंकाळी ५पर्यंत रक्तदानाच्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या हेरिटेज वास्तूलाही निळ्या रंगाने प्रकाशमय करून जनजागृती करण्यात येणार आहे.

‘समर्पण’च्या माध्यमातून साधणार हितगुज
रक्तदानाची गरज भासली की, वेळोवेळी वास्तव फाउंडेशनतर्फे समर्पण संस्थेला मदत करण्यात येईल. मात्र, अन्य कालावधीतही लहानग्या थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना भेटून त्यांच्याशी हितगुज साधण्यात येईल. जेणेकरून, या पुरुषांच्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील समस्यांचा विसर पडून, काही काळ आनंदात घालविण्यासाठी मदत होणार आहे.

Web Title:  Men's unique 'dedication' to overcome depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई