Join us

मासिक पाळीप्रमाणेच ‘त्या’ पोटलीविषयीची पोस्टही चुकीचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 4:05 AM

विश्वास न ठेवण्याचा तज्ज्ञांचा सल्लालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यासह मुंबईत कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. परिणामी, ...

विश्वास न ठेवण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. परिणामी, खाटा, औषध आणि अन्य सेवांचाही तुटवडा जाणवत आहे. दरम्यान, समाजमाध्यमांवर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी कापूर, लवंग, ओवा आणि निलगिरीच्या तेलाच्या पाेटलीचा उपाय सांगण्यात येत आहे. मात्र, मासिक पाळीच्या वेळी लस घेऊ नका, या पोस्टप्रमाणे याही पोस्टला कोणताही वैज्ञानिक आधार नसून अशा व्हायरल गोष्टींवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले.

समाजमाध्यमांवरील या पोस्टमध्ये कापूर, लवंग, ओवा आणि निलगिरीच्या तेलाचे काही थेंब एकत्र करून पाेटली बनवून त्याचा सुगंध घेतल्यास शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यास मदत होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हायरल पोस्टमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, कापूर, लवंग, ओवा आणि निलगिरीचे तेल मिसळून एक पाेटली तयार करा आणि दिवसभर त्याचा सुगंध घेत रहा. असे केल्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते. अशा प्रकारची पाेटली लडाखमधील पर्यटकांना ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागल्यावर दिली जाते, हा एक घरगुती उपाय आहे, असेही यात म्हटले आहे.

मात्र याविषयी श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. जयेश पेंढारकर यांनी सांगितले की, असा दावा सिद्ध करण्यासाठी कोणताही अहवाल नाही. एकंदरीत, कोरोना टाळण्यासाठी किंवा कोरोनापासून बरे होण्यासाठी काढा घेणे, आयुर्वेदिक औषधांचा अवलंब करणे यासारखे अनेक उपाय सध्या व्हायरल होत आहेत. परंतु डॉक्टरांना विचारल्याशिवाय कोणताही उपाय करू नका. यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता आहे, शिवाय आजार वाढून ताे गंभीर होण्याचाही धोका आहे.

* काेराेना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन गरजेचे !

एखाद्या व्यक्तीस श्वसनाचा त्रास किंवा दम, धाप लागत असल्यास घरगुती उपाय केल्यामुळे हा आजार बळावू शकतो. तसेच, वेळेवर निदान किंवा उपचार न झाल्यामुळे रुग्णाचा आजार गंभीर अवस्थेत जाण्याची शक्यता अधिक असते. अशा स्थितीत केवळ खात्रीलायक माहितीवरच विश्वास ठेवा. मुख्यतः विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क घालणे, अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडणे, संपर्क टाळणे, अंतर पाळणे, स्वच्छता राखणे, असे काेराेना प्रतिबंधात्मक नियम पाळणे गरजेचे असल्याचा सल्ला श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. सागर जैन यांनी दिला.

--------------------------------