कोरोनाबाधितांचे मानसिक आरोग्यही तपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:05 AM2020-12-09T04:05:31+5:302020-12-09T04:05:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना रुग्णांना उपचार प्रक्रियेदरम्यान वा कोरोनामुक्त झाल्यानंतरही अनेक मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना रुग्णांना उपचार प्रक्रियेदरम्यान वा कोरोनामुक्त झाल्यानंतरही अनेक मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. अशा स्थितीत बरेच रुग्ण सामाजिक दडपण आणि अन्य कारणांमुळे मानसिक आजारावर उपचार घेत नाहीत, हे लक्षात घेऊन आता आरोग्य विभागाने कोरोनाबाधितांचे मानसिक आरोग्यही तपासण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाबाधितांमध्ये उद्भवणाऱ्या मानसिक समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्याबाबत आरोग्य विभागाने समिती स्थापन केली होती. या समितीने नुकतीच ही मार्गदर्शक तत्त्वे शासनाला सादर केली आहेत. त्यानुसार उपाययोजना करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. कोरोनाबाधितांमध्ये मानसिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी रुग्णालयात मानसोपचार किंवा मानसशास्त्रज्ञांनी प्रत्येक रुग्णाचे आठवड्यातून एकदा समुपदेशन करावे. सातत्याने सेवा देत असलेले डॉक्टर, परिचारिका यांच्यासह आरोग्य कमर्चारी यांच्यामध्ये मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. तेव्हा हा तणाव दूर केला जाईल, यासाठीही उपाययोजना केल्या जाव्यात. रुग्णालयात मानसोपचार किंवा मानसशास्त्रज्ञ उपलब्ध नसल्यास खासगी सेवा देत असलेल्या तज्ज्ञांची नेमणूक करावी. त्यांचे मानधन कोरोना निधीतून दिले जाईल, असेही यात सांगण्यात आले आहे.