लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई – कोरोनावर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत, तशी माहिती आयसीएमआरच्या अहवालातून उघड झाली आहे. याखेरीज सामाजिक दबावामुळे आरोग्य कर्मचारी ओळखही लपवत असल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे.
आयसीएमआरच्या अहवालात देशभरातील ९६७ सदस्यांचा सहभाग होता. त्यात ओडिशा, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, केरळ, तामिळनाडू, मध्य प्रदेश, आसाम आणि मेघालय राज्यांचा समावेश होता. त्यात ५६ टक्के महिला आरोग्य कर्मचारी, तर ४६ टक्के पुरुष आरोग्य कर्मचारी आहेत. यांचा वयोगट २० ते ४० इतका आहे. २८ ऑगस्टपर्यंत देशभरातील ८७ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर महाराष्ट्रातील १ लाख ५८ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील २४ हजार ५०० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. राष्ट्रीय पातळीवर हे प्रमाण सर्वाधिक आहे.
या अहवालानुसार, बऱ्याच आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना कक्षात काम करत असताना शेजारी आणि मित्रपरिवारांपासून स्वतःची ओळख लपवल्याचे सांगितले आहे. ह्या आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्गाचे वाहक असल्याचे अनुभव कर्मचाऱ्यांनी मांडले आहेत. या अहवालाचे तज्ज्ञ डॉ. बिना थॅमस यांनी सांगितले की, कोरोना काळात आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रचंड शारीरिक आणि मानसिक वेदना सहन कराव्या लागल्या. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पोषक वातावरण तयार करत असताना समाजात जनजागृती निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.