समीर कर्णुक, मुंबईअंध, अपंग आणि मतिमंद मुलांना शिक्षण देणारे मानखुर्द बालसुधारगृहातील शिक्षक गेल्या तीन महिन्यांपासून पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत त्यांनी समाजकल्याण विभागाकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र विभागाकडून कुठलीही योग्य माहिती मिळत नसल्याने सध्या हे कर्मचारी काळ्या पट्ट्या बांधून शासनाचा निषेध करत आहेत. मानखुर्द बालसुधारगृहात मतिमंद मुलांसाठी वेगळा विभाग आहे. यात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत ३०० महिला आणि पुरुष वास्तव्यास आहेत. या मुलांच्या संगोपनासाठी या सुधारगृहात शिक्षक, कर्मचारी आणि अधिकारी मिळून ५९ जण काम करतात. २०१२ पूर्वी मतिमंद बालसुधागृहाचा कारभार चिल्ड्रन होम अंतर्गत सुरु होता. न्यायालयाच्या आदेशानंतर हा कारभार समाजकल्याण विभागाकडे सोपवण्यात आला. तेव्हापासून मतिमंद मुलांच्या संगोपनाचा आणि त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचा पगार हा समाजकल्याण विभागाकडून दिला जातो. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून येथील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना शासनाकडून पगारच देण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्या या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.घरखर्चासाठी काही महिलांनी अंगावरील दागिनेही गहाण ठेवले आहेत. शिवाय काहींनी कर्ज काढले आहेत. पगार लवकर मिळावेत, यासाठी युनियनतर्फे समाजकल्याण अधिकाऱ्यांशी अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र त्यांच्याकडून योग्य माहिती न देता नेहमीच वेगवेगळी कारणे ठेवली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मतिमंद बालसुधारगृहात राहणारी अनेक मुले ही अनाथ आहेत. तर काही मुलांना त्यांचे आई-वडिल याठिकाणी सोडून गेले आहेत. या मुलांना आधार मिळावा, यासाठी येथील शिक्षक आणि कर्मचारी त्यांचा आई-वडिलांप्रमाणे सांभाळ करतात. तसेच या मुलांना काहीतरी रोजगार मिळावा, यासाठी सुधारगृहातच कपडे शिवणे, कागदी बॅगा तयार करणे अशी कामे देखील त्यांना शिकवली जातात. (प्रतिनिधी)
मतिमंद मुलांचे शिक्षक उपेक्षितच
By admin | Published: August 20, 2015 2:02 AM