Join us

ताडदेवमध्ये माथेफिरुचा तरुणावर हल्ला; लोखंडी शस्त्राने नाकावर वार, रहिवाशांचा जीव धोक्यात

By मुकेश चव्हाण | Published: October 02, 2023 11:20 AM

माथेफिरु मनीष लाड याच्यामुळे बने चाळीतील लहान मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या जीवाला धोका असल्याची भीती रहिवाशांनी पोलिसांकडे व्यक्त केली.

मुंबई: ताडदेवमधील बने चाळ जवळील गणेश मंदीराच्या परिसरात एका स्थानिक माथेफिरुने तरुणावर लोखंडी धारधार शस्त्राने हल्ला केला. यामुळे तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला नाकावर १३ टाके पडले. याप्रकरणी पीडित तरुण रितेश नर याने माथेफिरु आरोपी मनीष लाड याच्याविरोधात ताडदेव पोलीस स्थानकांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी मनीष लाड विरोधात १ ऑक्टोबरला मध्यरात्री ३ वाजता गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी मनीष लाड याला पोलिसांनी तात्काळ अटक केली. 

तक्रारीत तरुणाने म्हटले की, मी रात्री ९.३० च्या सुमारास नेहमीप्रमाणे गणेश मंदीराजवळ बसलो होतो. त्यावेळी अचनाक बाजूने आरोपी आला आणि काहीही कारण नसताने त्याने माझ्यावर हल्ला केला. लोखंडी धारधार शस्त्राने माझ्या नाकावर त्याने वार केला. यासोबत पाठीत आणि डोक्यावर देखील माझ्यावर हल्ला केला. त्याला पकडण्याचा मी प्रयत्न केला मात्र त्याच्या अंगावर कपडे नसल्याने आणि तो भिजलेला असल्यामुळे पकडणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्याने पळ काढला. यानंतर काही अंतरावर असलेल्या मित्रांनी मला नायर रुग्णालयात दाखल केले, असं पीडित तरुणाने सांगितले.

आरोपीविरोधात अनेक रहिवाशांची तक्रार-

माथेफिरु मनीष लाड याच्याविरोधात विभागातील अनेक नागरिकांची तक्रार आहे. आरोपी त्या दिवशी सकाळपासून धारधार लोखंडी शस्त्र घेऊन फिरत होता. त्याने बने चाळीतील दोन-तीन जणांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली. तसेच समोरील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जाऊन शिवीगाळ करत एका व्यक्तीच्या नावाने धमकी दिली. आरोपी मनीष लाड अनेकांना धमक्या देतो. त्यालाआधी देखील पोलिसांनी अटक केली होती. माथेफिरु मनीष लाडमुळे बने चाळीतील लहान मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या जीवाला धोका असल्याची भीती रहिवाशांनी पोलिसांकडे व्यक्त केली. माथेफिरु असला म्हणून काय झाले, त्याने एकाचा जीव घेतल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का?, असा संतप्त सवाल देखील नागरिक उपस्थित करत आहे. 

टॅग्स :गुन्हेगारीमुंबईपोलिस