Join us  

‘फूड फॉर आॅल’ला मंथनची भेट

By admin | Published: May 15, 2016 4:15 AM

मंथन आर्ट फाउंडेशनचा ‘डूडल- सोशल अ‍ॅड फेस्ट २०१६’ या सामाजिक जाहिरात महोत्सवाची नुकतीच सांगता झाली. या महोत्सवामध्ये समाजातील वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे कलाविष्कार बघायला मिळाले.

मुंबई : मंथन आर्ट फाउंडेशनचा ‘डूडल- सोशल अ‍ॅड फेस्ट २०१६’ या सामाजिक जाहिरात महोत्सवाची नुकतीच सांगता झाली. या महोत्सवामध्ये समाजातील वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे कलाविष्कार बघायला मिळाले. या स्पर्धेत महाराष्ट्र, तसेच महाराष्ट्राच्या बाहेरील ५५० विद्यार्थी व व्यावसायिकांनी सहभाग नोंदविला. त्यातून १६ विजयी स्पर्धकांना गौरविण्यात आले.या महोत्सवातील विविध विषयांशी संबंधित भित्तीचित्रे त्या-त्या विषयाशी निगडित असणाऱ्या सामाजिक संस्थांना विनामूल्य देण्याचा हा उपक्रम आहे. या उपक्रमाची सुरुवात ऋषिकेश कदम यांच्या ‘फूड फॉर आॅल’ या संस्थेपासून करण्यात आली. ‘अन्नाची जागा नाही कचऱ्याची पेटी, कोणीतरी झोपत असेल उपाशी पोटी’ या घोषवाक्यातून ‘अन्न वाया टाकू नका’ असा संदेश देणारे अप्रतिम भित्तीचित्र मंथन आर्ट स्कूलच्या कविता पाटोळे या विद्यार्थिनीने तयार केले होते.महाराष्ट्रभरातील कलाकारांच्या कलागुणांना सामाजिकदृष्ट्या एक वेगळे व्यासपीठ उपलब्ध व्हावे. कलेचा वापर फक्त व्यवसाय म्हणून न करता, एक सुदृढ समाज घडवण्यासाठी व्हावा, या उद्देशाने मंथनने डूडल सोशल अ‍ॅड फेस्ट या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कलाकृती सामाजिक कार्य करू पाहणाऱ्या संस्थांना भेट स्वरूप देऊन, त्यांच्या मोहिमेस पाठिंबा दर्शविण्याची सुरुवात आम्ही या उपक्रमातून सुरू केली आहे. फूड फॉर आॅल संस्था अन्न वाया जाऊ नये, यासाठी जनजागृती व भुकेलेल्यांची भूक भागविण्याचे कार्य करत आहे. संस्थेला हे भित्तीपत्रक भेट देताना विशेष आनंद होत आहे, असे प्रतिपादन मंथनचे अध्यक्ष शशिकांत गवळी यांनी केले. (प्रतिनिधी)