सांगली - मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा मनसेवर टिका केली आहे. विशेष म्हणजे मिटकरींनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीतच भाषण करताना, राज ठाकरेंचा उल्लेख खाज ठाकरे असा केला. त्यानंतर, आपण कुणाला घाबरत नाही, त्यांची आणि भाजपची लावारीस कार्टी धमक्या देण्याशिवाय काही करू शकत नाही, असे म्हणत मनसेच्या ट्रोलर्संनाही टोला लगावला.
अमोल मिटकरी यांनी इस्लामपूरच्या सभेत भाजपसह मनसेवर जोरदार टिका केली. भाजपची बी टीम एमआयएम आम्ही ऐकलं होतं, आता भाजपची सी टीम आली आहे. राज ठाकरेंनी अगोदर मराठीचा मुद्दा उपस्थित केला. त्यासाठी, शिवाजी महाराजांचा मुद्दा उपस्थित केला, असे म्हणत मिटकरींनी राज ठाकरेंची नक्कलही करून दाखवली. मनसेचा 5 रंगाचा झेंडा आता एका रंगावर आलाय. त्यावर राजमुद्रा आहे, पण त्यांच्याच पक्षाच्या एकाला मी राजमुद्रा विचारली, तर आम्हाला नाही विचारायचं असं त्यांनी म्हटल्याचा किस्साही मिटकरी यांनी सांगितला. 14 आमदारांवरुन तुमचा पक्ष 1 आमदारावर ऐऊन ठेपलाय, आता तर मुस्लीम मतदारही तुमच्याकडून दुरावलाय, असेही मिटकरींनी म्हटलं.
अमोल मिटकरींनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मोहित कंबोज यांच्यासह गुणरत्न सदावर्तेंवरही टिका केली. गोवा जिंकल्यानंतर नागपुरात रॅली काढणारे फडणवीस कोल्हापूरच्या पराभवानंतर गायब झाल्याचं दिसून आल्याचंही त्यांनी म्हटलं.
लाव रे तो व्हिडिओ
अमोल मिटकरींनी इस्लामपूरच्या सभेत लाव रे तो व्हिडिओचा प्रयोगही त्यांनी केला. त्यामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार यांनी मुंबईला अंडरवर्ल्डपासून कसं वाचवलं हे सांगितलं होतं. तर, दुसऱ्या व्हिडिओत अलटबिहारी वाजपेयी यांनी शरद पवार यांनी कच्छच्या भूकंपावेळी दिलेल्या योगदानाचं कौतूक केलं.