Join us

शिवाजी महाराजांचा उल्लेख आदरपूर्वक करा, खा. संभाजी छत्रपती यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 4:12 AM

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे नामकरण करा.

मुंबई : महाराष्ट्रातील ज्या सार्वजनिक स्थळांचे नाव केवळ ‘शिवाजी’ असे आहे, त्या सर्वांचा नामविस्तार करुन ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे करा, तसेच कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे नामकरण करा, अशी मागणी राज्यसभेचे सदस्य, खा. संभाजी छत्रपती राजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.आपल्या पत्रात ते म्हणतात, महाराष्ट्रातील जनमानसात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान किती मोठे आहे हे आपणास माहिती आहेच. काही दिवसांपासून महाराजांच्या नामोच्चारावरुन मोठी चर्चा होत आहे. ‘केबीसी’ या अमिताभ बच्चन यांच्या कार्यक्रमात ‘शिवाजी’, असा एकेरी उल्लेख केला गेला होता. तर केंद्रीयमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी देखील एकेरी उल्लेख केला होता. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून, यावर कायमस्वरुपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी ज्या सार्वजनिक स्थळांचे नाव फक्त ‘शिवाजी’ असे आहे त्यांचा नामविस्तार करा.मराठा आरक्षणाकरिता महाराष्टÑातील सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरुन लढली. त्यात अनेक ठिकाणी आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अनेक आंदोलकांवर विनाकारण गुन्हे नोंदवले गेले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याबद्दल आपण पत्र लिहीले होते. आपण यात लक्ष घालून हे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणीही छत्रपती संभाजी राजे यांनी केली आहे.

टॅग्स :संभाजी राजे छत्रपतीछत्रपती शिवाजी महाराजउद्धव ठाकरे