Join us

ठाण्यात साडेचार लाखांची मेफेड्रॉन पावडर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:08 AM

ठाणे : ठाणे येथील राबोडी भागात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तीन जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट १ ने ...

ठाणे : ठाणे येथील राबोडी भागात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तीन जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट १ ने अटक केली असून, त्यांच्याकडून साडेचार लाख रुपयांची ९० ग्रॅम मेफेड्रॉन पावडर जप्त करण्यात आली आहे.

बनोबर शफीक खोटाळ (३१), आदिल नजीरभाई शेख (२४) आणि असामा मोहम्मद हुसेन भाभा (१९) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. यापैकी खोटाळ हा मुंबईचा, तर आदिल आणि असामा हे दोघे गुजरातचे रहिवासी आहेत. हे तिघे जण राबोडी परिसरातील सेवारस्त्यावर मेफेड्रॉन पावडर विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने सापळा रचून तिघांना अटक केली. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सहआयुक्त सुरेशकुमार मेकला, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) संजय येनपुरे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) लक्ष्मीकांत पाटील, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे (शोध-१) किसन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.