Cyrus Mistry Accident: प्रसिद्ध उद्योजक आणि टाटा समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे पालघरजवळ झालेल्या एका रस्ते अपघातात निधन झाले. सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर अवघ्या देशभरातून शोक व्यक्त करण्यात आला. सायरस मिस्त्री यांची अपघातग्रस्त गाडी कासा पोलिसांनी ताब्यात घेतली असून, अपघाताची यंत्रणांकडून चौकशी सुरूच आहे. गाडीच्या चीपचा डेटा जर्मनीत पाठविला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. यासंदर्भात मर्सिडीजचा अहवाल सादर केला होता. यानंतर आता हाँगकाँगमधील मर्सिडीज कंपनीच्या तज्ज्ञांचे पथक सायरस मिस्त्री यांच्या कारची तपासणी आणि चौकशीसाठी पोहोचले.
सायरस मिस्त्री ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या मर्सिडीज-बेंझ जीएलसी एसयूव्हीमध्ये काही तांत्रिक त्रुटी होत्या का, हे शोधण्यासाठी टीम आली आहे. पालघर जिल्ह्यातील एका पुलावरील रोड डिव्हायडरला मर्सिडीज-बेंझ एसयूव्हीने धडक दिल्याने मिस्त्री आणि त्यांचा मित्र जहांगीर पांडोळे यांचे निधन झाले होते. गाडी चालवत असलेल्या अनाहिता पांडोळे आणि त्यांचे पती दारियस पांडोळे या कारमधील इतर दोन जण जखमी झाले होते. सध्या त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मर्सिडीज कंपनीने सादर केलेला अहवालात काय होते?
मर्सिडीजने अहवालात सांगितले आहे की, अपघाताच्या पाच सेकंद आधी ब्रेक दाबवण्यात आला होता. यावेळी कारचा वेग ताशी १०० किमी इतका होता. अनहिता यांनी ब्रेक दाबला तेव्हा कारचा वेग ताशी ८९ किमी वर पोहोचला आणि पुलाला धडक दिली. पोलिसांनी कंपनीकडे अनहित यांनी कार ताशी १०० किमी वेगात असताना ब्रेक दाबला की, त्याच्याआधीच दाबला होता अशी विचारणा केली होती. तसेच किती वेळा ब्रेक दाबवण्यात आला होता, असेही विचारण्यात आले होते. तसेच मर्सिडीज कंपनी १० सप्टेंबरला अपघातग्रस्त कार १२ सप्टेंबरला शोरुममध्ये घेऊन जाणार आहे. हाँगकाँगमधील एक पथक येऊन या कारची पाहणी करणार असल्याचेही सांगण्यात आले होते. त्यानुसार हे पथक भारतात दाखल झाले आहे.
दरम्यान, आरटीओने आपल्या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाला तेव्हा चार एअरबॅग उघडल्या होत्या. या चारही एअरबॅग पुढील बाजूस होत्या. यामधील एक एअरबॅग चालकाच्या डोक्यापुढे, दुसरी गुडघ्याजवळ आणि तिसरी त्याच्या डोक्याच्या वरच्या बाजूला उघडली होती. चौथी एअरबॅग चालकाच्या बाजूच्या सीटवरील पुढील बाजूला होती.